LIVE STREAM

AkolaLatest News

तीन महिलांच्या सतर्कतेमुळे हरवलेली मुलगी पालकांकडे सुखरूप!

अकोला : अकोला बस स्थानक परिसरात रात्री 9 वाजताच्या सुमारास एक 17 वर्षीय मुलगी विनापालक भटकताना आढळून आली. तीन जागरूक महिलांच्या सतर्कतेमुळे आणि बाल कल्याण समिती तसेच Access to Justice प्रकल्प (I.S.W.S.) अकोला यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे ही मुलगी अखेर तिच्या पालकांकडे सुखरूप पोहोचली.

ही मुलगी आपल्या आई-वडिलांसोबत नातेवाईकांकडे मालेगाव येथे लग्नसमारंभासाठी आली होती. कार्यक्रम आटोपून सर्वजण मुंबईला जाण्यासाठी निघाले होते. रिसोडहून बसने अकोला बस स्थानकात उतरल्यानंतर रेल्वे स्टेशनकडे जाण्याच्या तयारीत असताना पाणी पिण्यासाठी गेलेली मुलगी गर्दीत हरवली. अकोला परिसरात नवीन असल्याने तिला वाट सापडली नाही आणि ती एकटीच पालकांचा शोध घेत होती.

त्याचवेळी बस स्थानक परिसरात असणाऱ्या तीन महिलांना ही मुलगी एकटी दिसून आली. त्यांनी तिला विचारपूस करून तत्काळ सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात आणले. तेथून बाल कल्याण समिती अकोला अध्यक्ष अनिता शिंदे यांना माहिती देण्यात आली. त्यांच्या आदेशानंतर Access to Justice प्रकल्पाचे जिल्हा समन्वयक शंकर वाघमारे, समन्वयक सपोर्ट पर्सन सपना गजभिये आणि राजश्री किर्तीवार यांनी पोलीस ठाण्यात जाऊन मुलीचे समुपदेशन केले.

समुपदेशनात मिळालेल्या माहितीनुसार मुलीची आणि तिच्या पालकांची तात्पुरती ताटातूट झाली होती. मुलीची वैद्यकीय तपासणी शासकीय रुग्णालयात करून तिला तात्पुरता निवारा म्हणून गायत्री बालिकाश्रम, मलकापूर येथे ठेवण्यात आले. पालकांचा शोध घेण्याची मोहीम सुरू झाल्यानंतर अखेर तिच्या आईशी संपर्क झाला. त्यानंतर सर्व औपचारिक प्रक्रिया पूर्ण करून बाल कल्याण समितीसमोर मुलगी आणि पालकांची ओळख पटवून तिला सुखरूप आईकडे सुपूर्त करण्यात आले.

या प्रकरणात बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष अनिता गुरव, सदस्य राजेश देशमुख, प्रांजली जयस्वाल, शिला तोषणीवाल, विनय दांदळे, सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन व Access to Justice प्रकल्प I.S.W.S. अकोला यांचे सहकार्य मोलाचे ठरले.
ही घटना दाखवते की सामान्य नागरिक आणि प्रशासन एकत्र आले, तर कुठलीही आपत्ती टाळता येऊ शकते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!