पुष्पक कॉलनीचा हलाखीचा चेहरा समोर, संतप्त नागरिकांचा आक्रोश
अमरावती : शहरातील प्रगत आणि प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या पुष्पक कॉलनीतील नागरिक सध्या भीषण नागरी समस्यांनी त्रस्त झाले आहेत. पावसाळा अद्याप सुरू झाला नसतानाही कॉलनीतील मुख्य रस्ता चिखलात पूर्णपणे बुडाला असून, त्यावरून चालणे देखील कठीण झाले आहे. रस्त्यांची झालेली चाळण, अपूर्ण नाले बांधकाम, आणि रस्त्यावर सांडणारे गटारांचे पाणी यामुळे नागरिक अक्षरशः कोंडीत सापडले आहेत.
वाहतुकीचा जीवघेणा त्रास
रस्त्याची अवस्था इतकी खराब झाली आहे की, दुचाकीस्वार आणि चारचाकी वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. पायदळ जाणेही अशक्य झाले आहे. काही ठिकाणी पाण्यामुळे अपघाताचे प्रसंगही घडले आहेत.
सांडपाणी थेट घरात!
नाल्यांचं बांधकाम अपूर्ण असून, गटारातील सांडपाणी रस्त्यावरून नागरिकांच्या घरांमध्ये शिरत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी आणि अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ही परिस्थिती आरोग्यासाठी धोका निर्माण करणारी आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष – आश्वासनांपुरती मर्यादा
स्थानिक नागरिकांनी महानगरपालिका आणि महावितरण कार्यालयात वारंवार तक्रारी करूनही, केवळ आश्वासनं मिळत आहेत. कामाची कोणतीही ठोस कृती अद्याप झालेली नाही, त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.
आता नागरिक रस्त्यावर!
प्रशासनाच्या दिरंगाईला कंटाळून स्थानिक रहिवासी, महिला मंडळ, व्यापारी आणि युवकांनी एकत्र येऊन आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. “रस्ते नीट करा, लाईट द्या, नाहीतर आम्ही तीव्र आंदोलन करू,” असा इशारा नागरिकांनी दिला आहे.