बच्चू कडू यांना दिलासा; सरकारी कामात अडथळ्याच्या खटल्यातून सत्र न्यायालयाने निर्दोष केलं मुक्त
अचलपूर : परतवाडा एसटी डेपोसमोर पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करून सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी सहा महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आलेल्या बच्चू कडू व इतर तीन आरोपींना जिल्हा सत्र न्यायालय अचलपूरने निर्दोष घोषित करत दिलासा दिला आहे.
मूळ प्रकरण काय होतं?
23 एप्रिल 2016 रोजी परतवाडा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 353, 180, 332, 294, 34 नुसार बच्चू कडू, अंकुश जवळ, मंगेश देशमुख व धीरज निकम यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस कर्मचारी इंग्रजी चौधरी याला मारहाण करून सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप करण्यात आला होता.
प्रथम न्यायालयाचा निर्णय:
या प्रकरणात सरकारी पक्षाने 15 साक्षीदारांची साक्ष न्यायालयात मांडली होती. त्यानंतर अचलपूरचे प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांनी सर्व आरोपींना सहा महिन्यांची शिक्षा सुनावली होती.
अपील आणि युक्तिवाद:
या निर्णयाविरोधात बच्चू कडूंनी जिल्हा सत्र न्यायालय अचलपूर येथे अपील दाखल केले होते. 16 मे 2025 रोजी ऍड. महेश देशमुख यांनी सखोल युक्तिवाद सादर करत कनिष्ठ न्यायालयाने केलेला निर्णय चुकीचा असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यांनी साक्षीदारांचे कथन, घटनास्थळावरील पुरावे, आरोपींची भूमिका आदी बाबींवर प्रकाश टाकला.
निर्णय:
सत्र न्यायाधीश श्री. आर. बी. रेहवाडे यांनी युक्तिवाद ग्राह्य धरत कनिष्ठ न्यायालयाचा निकाल रद्द केला आणि सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केलं.
वकिलांचे योगदान:
या खटल्यात ऍडव्होकेट महेश देशमुख यांना ऍड. सय्यद कलीम, ऍड. अशी देशमुख, व ऍड. चैतन्य खारोडे यांनी सहकार्य केलं.