स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांसोबत दुजाभाव झाल्यास ‘आमचा पाईप आणि तुमचं डोकं’

अकोला : शिवसेना (शिंदे गट)मध्ये अकोल्यात अंतर्गत गटबाजीचे सूर पुन्हा एकदा सार्वजनिक झाले आहेत. जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथे घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत नवले गटाकडून माजी आमदार व शिंदे गटाचे वरिष्ठ नेते गोपीकिशन बाजोरिया यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली.
या बैठकीत जिल्हा प्रमुख अश्विन नवले यांनी बाजोरिया यांच्यावर कार्यकर्त्यांसोबत दुजाभाव केल्याचा आरोप करत, “स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये जर कार्यकर्त्यांना डावलले गेले, तर ‘आमचा पाईप आणि तुमचं डोकं’ अशी भूमिका आमची असेल,” असा थेट इशारा दिला. त्यामुळे अकोल्यातील शिंदे गटाच्या शिवसेनेचे राजकीय वातावरण तापले आहे.
नवले गटाच्या पदाधिकाऱ्यांनी बाजोरिया यांच्यावर निधी अपहाराचेही गंभीर आरोप केले असून, त्यांना पदावरून हटवण्याची मागणीही करण्यात आली आहे. त्यामुळे ‘दोन जिल्हाप्रमुख विरुद्ध दोन जिल्हाप्रमुख’ असा सामना शिंदे गटात रंगताना दिसत आहे.