अकोला ACB पथकाची मलकापुरात कारवाई; सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गजानन माळी 14 हजारांची लाच घेताना अटकेत!

मलकापूर : अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मलकापुरात मोठी कारवाई करत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गजानन देवचंद माळी यांना १४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली आहे. ही कारवाई २३ मे रोजी मुदडा येथील शिवनेरी ढाबा परिसरात पार पडली.
तक्रारदार हे रेती वाहतूक व्यवसायिक असून, आरोपी माळी यांनी एप्रिल व मे महिन्यांसाठी प्रत्येकी ८ हजार रुपयांची लाच मागणी केली होती. तक्रारदाराने थेट अॅन्टी करप्शन ब्युरो अकोला कार्यालयात तक्रार दाखल केली. १३ मे रोजी पडताळणी दरम्यान माळी यांनी तडजोडीअंती १४ हजार रुपये मागितल्याचे स्पष्ट झाले होते.
यावरून ACB पथकाने सापळा रचत माळी यांना तक्रारदाराकडून १४ हजार रुपये घेताना पंचासमक्ष अटक केली. लाच स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले असून, त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाईचे नेतृत्व:
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मा. श्री. मारुती जगताप, अपर पोलीस अधीक्षक मा. श्री. सचिंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनात सापळा अधिकारी श्री. मिलिंदकुमार बहाकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी पार पाडली.