अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना जबर फटका; तीळ, भुईमुग, फळबागांचे मोठे नुकसान

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात अवकाळी पावसाने थैमान घालत शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. काढणीच्या टप्प्यावर आलेली पिकं पावसामुळे भिजून गेली असून, विशेषतः तीळ, भुईमुग आणि फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे.
जिल्ह्यातील अनेक भागांत शनिवारी रात्री आणि रविवारी सकाळी अचानक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. कृषी विभागाचे सहाय्यक सध्या विविध मागण्यांसाठी संपावर असल्याने नुकसानीचे पंचनामे रखडले आहेत. यामुळे नुकसानभरपाई कधी मिळेल, याचा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, “तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी,” अन्यथा आंदोलनाचा इशाराही दिला जात आहे. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये बागायतदार आणि लघु शेतकरी मोठ्या संकटात सापडले असून शासनाने त्वरित हस्तक्षेप करावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे.