अ. भा. महानुभाव परिषदेच्या अध्यक्षपदी अमरावतीचे महंत कारंजेकर बाबा; जूनमध्ये नाशिक अधिवेशनात पदभार स्वीकारणार

अमरावती : अमरावतीच्या महानुभाव आश्रमाचे प्रमुख, कवीश्वर कुलाचार्य महंत श्री मोहन कारंजेकर बाबा यांची अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. परिषदेचे मावळते अध्यक्ष बाबा फलटणकर यांनी अधिकृतरित्या कारंजेकर बाबा यांच्या नावाची घोषणा केली.
या पार्श्वभूमीवर पुढील महिन्यात जून २०२५ मध्ये नाशिक येथील कुंभ नगरीत अधिवेशन आयोजित करण्यात आले असून, याच अधिवेशनात नवनिर्वाचित अध्यक्ष कारंजेकर बाबा औपचारिकरित्या पदभार स्वीकारणार आहेत.
परिषदेच्या सदस्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत विविध धार्मिक, सामाजिक विषयांवर चर्चा झाली. यावेळी नवीन अध्यक्ष निवडीसाठी ठराव मांडण्यात आला आणि कारंजेकर बाबा यांची एकमताने निवड करण्यात आली.
परिषदेचे प्रमुख कार्यकर्ते, विविध आश्रमांचे महंत व पंथीय सदस्य यांनी एकत्र येत या ऐतिहासिक निवडीचा सर्वानुमते स्वागत केला. यावेळी कारंजेकर बाबा यांचा सत्कार करण्यात आला व त्यांच्या अध्यात्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक योगदानाची विशेष दखल घेण्यात आली.
महानुभाव परिषदेचा इतिहास, परंपरा आणि कार्याचा गौरव राखत नवीन अध्यक्षपदी येणाऱ्या कारंजेकर बाबांकडून नव्या दिशेने नेतृत्वाची अपेक्षा व्यक्त होत आहे.