दोन कुख्यात चोर गजाआड, नागपूर पोलिसांची धडक कारवाई

नागपूर : नागपूरच्या मानकापूर परिसरातील पद्मावती नगरमधील जाधव ले-आऊट येथील एका घरात मोठ्या प्रमाणावर घरफोडीचा प्रकार उघडकीस आला आहे. फिर्यादी लुकेश सुरेशराव कोरडे आणि त्यांचे कुटुंब बाहेरगावी लग्नसमारंभासाठी गेले होते. परत आल्यावर त्यांनी घराचा दरवाजा तुटलेला, कपाटं उघडीस असलेली आणि सोन्याची पोत, चांदीची पैंजण, बेंटेक्सची पोत, रोख रक्कम, दोन लॅपटॉप यांसह तब्बल ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल गायब असल्याचे पाहिले.
पोलीस कारवाई आणि तपास
मानकापूर पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवून तपास सुरु केला. गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून पोलिसांनी झेंडा चौकाजवळ पेट्रोलिंग करत असताना दोन संशयितांना मोटरसायकलवर फिरताना पाहिले. शफीनगर पुलाजवळ त्यांना थांबवून चौकशी केली असता, त्यांनी स्वतःचे नाव इमरान शेख उर्फ छोटा इम्मु व महेंद्र उर्फ चर्सी शाहु असे सांगितले.
पोलिसांनी केलेली मोठी हेरगिरी
संशयितांकडून चोरीस गेलेली अॅक्टीव्हा स्कूटर, दोन लॅपटॉप, सोन्याचे दागिने, चांदीचे जोडवे, रोख रक्कम, पोत आणि पैंजण असा एकूण १,५२,८०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
तसेच अनेक इतर घरफोडींचे पुरावे देखील पोलिसांच्या ताब्यात आले.आरोपींनी मानकापूर पोलिसांच्या हद्दीत आणखी तीन घरफोडी व वाहनचोरीचे गुन्हे कबूल केले आहेत.
पोलिस तपास पथक
या सर्व कारवाईचे नेतृत्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर, पोलीस निरीक्षक अमोल इंगोले, उपनिरीक्षक अमित देशमुख व त्यांच्या तपास पथकाने केले.
नागपूर पोलिसांची प्रशंसनीय कामगिरी
मानकापूर पोलिसांनी वेळेत आणि कुशलतेने गुन्हेगारांना अटक करून लाखोंच्या मुद्देमालासह ताबा घेतला, ही कारवाई नागपूरतील सुरक्षिततेसाठी मोठा यशस्वी टप्पा आहे.