नवा गडी नवा राज! पोलिस आयुक्त चावरीया यांचा जुगार अड्ड्यांवर छापा

अमरावती : “नवा गडी, नवा राज” हाच मंत्र घेऊन कामाला लागलेल्या नव्या शहर पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांनी अमरावतीतील अवैध मटका व्यवसायावर कडक कारवाईस सुरुवात केली आहे. बडनेरा येथील वरली मटका जुगार अड्ड्यांवर छापा टाकून तीन आरोपींना ताब्यात घेतले असून हजारोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा धाडसी छापा
बडनेऱ्यातील जुनी वस्ती परिसरातील मोमीनपुरा येथे प्रेमदास वासनिक (रा. पाच बंगला), सलीम शहा मुस्तफा शहा (रा. नववस्ती) आणि करीम उर्फ लाला चौधरी यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून २,३४० रुपयांचा मटका जुगारसंबंधित मुद्देमाल जप्त करण्यात आला.
त्याचबरोबर आठवडी बाजार परिसरातील दुसऱ्या अड्ड्यावर देखील धाड टाकण्यात आली. या कारवाईत ३,०२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून तीन आरोपींना अटक करण्यात आली. सर्व प्रकरणांमध्ये जुगार अॅक्ट १२अ आणि कलम ४९ बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सात पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन; खात्यात खळबळ
याच दरम्यान, ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अंतर्गत सात पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली असून अवैध व्यवसायकांशी संगनमत, भ्रष्टाचार व विश्वासघाताचे गंभीर आरोप या कर्मचाऱ्यांवर ठेवले गेले आहेत.
विशेष बाब म्हणजे पोलिस खात्यातीलच एका खबऱ्याने व्हिडीओ आणि ठोस पुरावे सादर केल्याने हे प्रकरण उघडकीस आले. यामुळे पोलीस खात्यात अंतर्गत विश्वासाचे संबंध हादरले असून, प्रत्येक अधिकारी एकमेकांकडे संशयाने पाहताना दिसत आहे.
धडक मोहिमेचे नेतृत्व
ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस उपायुक्त गणेश शिंदे
कल्पना बारवकर
सागर पाटील
पोलिस निरीक्षक बाबाराव अवचार
यांच्या सहकार्याने गुन्हे शाखा युनिट क्रमांक २ कडून पार पडली.
पोलिस खात्यात मोठी हालचाल सुरू
नवीन पोलिस आयुक्तांच्या नियुक्तीनंतर अमरावती शहरात गुन्हेगारी, जुगार अड्डे आणि पोलिसांतील भ्रष्ट प्रवृत्तींवर थेट कारवाईची मोहीम सुरू झाली आहे. यामुळे अनेक बड्या “जुगार सम्राटांमध्ये” भीतीचं वातावरण पसरलं आहे.