Latest NewsYavatmal
यवतमाळ : चोरीच्या दोन मोटरसायकली स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत जप्त

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) केवळ सहा तासांत चोरीच्या दोन मोटरसायकली जप्त करत एकाला अटक केली आहे. या तडाखेबंद कारवाईबद्दल जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी पथकाचे कौतुक केले आहे.
२२ मे रोजी दुपारी दीड वाजता महागाव तालुक्यातील डोंगरगाव येथील प्रवीण कळणुजी मात्रे यांची मोटरसायकल आंबेडकर चौकातून चोरीला गेली होती. घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पुसद पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला.
अवघ्या काही तासांत उमरखेड येथील प्रदीप सुदामराव देबगुंडे या संशयित आरोपीला अटक करण्यात आली. त्याच्याकडून दोन चोरीच्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी ही कामगिरी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडली आहे.