Gujarat ATS: आदितीच्या संपर्कात आला अन् हनीट्रॅपमध्ये अडकला; गुजरातच्या तरुणाची पाकिस्तानसाठी हेरगिरी

पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या एका कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्याला गुजरात एटीएसनं अटक केलीय. गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील सीमावर्ती भागातून त्याला अटक करण्यात आलीय. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव सहदेव सिंह गोहिल असं आहे. सहदेव आरोग्य कर्मचारी आहे. एटीएसने दिलेल्या माहितीनुसार,आरोपीने भारतीय सीमा, बीएसएफ आणि भारतीय नौदलाच्या कारवाया, परिसराचे फोटो आणि इतर संवेदनशील माहिती पाकिस्तानला पाठवली होती. यासह त्याने गुजरातच्या अनेक सीमावर्ती भागांची माहितीही शेअर केली होती.
दरम्यान एटीएसनं पाकिस्तानी हेर सहदेव सिंह यांची चौकशी केली आहे. सहदेव सिंह हा जून-जूलै २०२३ पासून ‘अदिती भारद्वाज’ नावाच्या पाकिस्तानी एजंटच्या संपर्कात होता. दोघांमध्ये व्हॉट्सएपवर संभाषण सुरू होतं. जानेवारी २०२५ मध्ये सहदेव सिंहने त्याच्या आधार कार्डचा वापर करून एक भारतीय सिम कार्ड मिळवलं आणि फेब्रुवारी २०२५ मध्ये त्याने ते सिम कार्ड ओटीपीद्वारे भारद्वाजला दिले होते. त्या द्वारे ते व्हॉट्सएप कॉलिंग आणि मेसेज करू लागले.
४० हजार रुपयांसाठी गद्दारी
हेरगिरीच्या बदल्यात सहदेव सिंहला ४०,००० रुपयांपर्यंतची रक्कम देण्यात आली होती. तो पाकिस्तानसाठी कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करत होता. त्याचा फोन फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (FSL) मध्ये पाठवण्यात आलाय. तेथे त्याचे चॅटिंग, लोकेशन आणि मीडिया ट्रान्सफरचे विश्लेषण केलं जाणार आहे. गुजरात एटीएस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे. या हेरगिरी नेटवर्कमध्ये आणखी लोकांचा सहभाग असण्याची शक्यता आहे. सुरक्षा एजन्सी आता कॉल डिटेल्स, आर्थिक व्यवहार आणि डिजिटल उपकरणांची चौकशी करत आहेत.