अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

यवतमाळ : यवतमाळ शहरालगतच्या नागपूर बायपास रोडवर बाजोरिया गोडावूनजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. कुंदन शिवशंकर फटींग (रा. घोराड, जि. वर्धा) असे मृत युवकाचे नाव असून, तो आपल्या पुतणीला सोडून गावी परतत असताना हा अपघात झाला.
घटनेचा तपशील
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंदन फटींग आपल्या पुतणी गौरी हिला आर्णी तालुक्यातील उमरी पठार येथे सोडायला दुचाकी (क्र. एमएच-३२-एई-४२६९) ने गेला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तो स्वतःच्या गावी परतत असताना नागपूर बायपास मार्गावर अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली.
या अपघातात कुंदनचा जागीच मृत्यू झाला. धडक देणारे वाहन घटनास्थळावरून फरार झाले असून, अजून त्याचा तपास सुरू आहे.
शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
या प्रकरणी कुंदनचे नातेवाईक मारोती महादेवराव फटींग (वय ४२, रा. घोराड) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून अज्ञात वाहनचालकाविरोधात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाणेदार रामकृष्ण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस याप्रकरणाचा तपास करत आहेत.