शॉर्टसर्किटने घेतले बापलेकाचे प्राण, मुंडगावमधील दुर्दैवी घटना

अकोट : मुंडगाव (ता. अकोट) येथील बाजारपुरा भागात सोमवारी मध्यरात्री घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेत बाप-लेकाचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या या भीषण आगीत घरातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाल्याची माहिती आहे. एकूण अंदाजे ८ लाख ६० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
आगीचं भीषण दृश्य आणि बचावाचा अपयशी प्रयत्न
मिळालेल्या माहितीनुसार, बाजारपुरा येथील रहिवासी सचिन हरिभाऊ ठाकरे यांच्या घरात मध्यरात्री अचानक शॉर्टसर्किटमुळे आग लागली. यावेळी त्यांचा ९ वर्षीय मुलगा स्वराज ठाकरे हा बेडरूममध्ये झोपेत होता. धूर बाहेर येत असल्याचे लक्षात येताच वडील सचिन यांनी धावत जाऊन मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र दोघेही आगीच्या भक्षस्थानी पडले.
रुग्णालयात अखेरचा श्वास
या भीषण आगीत गंभीररित्या भाजलेल्या बापलेकाला तत्काळ अकोला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी प्रयत्न करूनही दोघांना वाचवता आलं नाही. दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
घराचे मोठे आर्थिक नुकसान
या आगीत घरातील सोने-चांदीचे दागिने (३.७५ लाख), कपडे व घरगुती साहित्य (३ लाख), व रोख रक्कम (१.८५ लाख रुपये) असे एकूण अंदाजे ८ लाख ६० हजार रुपयांचे साहित्य जळून खाक झाले.
प्रशासनाचा घटनास्थळी पाहणी दौरा
घटनेची माहिती मिळताच अकोट ग्रामीणचे API योगिता ठाकरे, बिट जमादार निलेश खंडारे, पो.कॉ. जाधव, गलांडे, वैराळे, तसेच नायब तहसीलदार सुनील थोटे, मंडळ अधिकारी मनोहर अढाऊ, तलाठी आशेर परमार्थ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.