सोने आभूषण घेऊन दाम्पत्य बसले ऑटोत , अज्ञात दोघीनी उडविली सोन्याची पोत , गाडगे नगरातील घटना

अमरावती : गाडगे नगर परिसरात भरदिवसा एक धक्कादायक चोरीची घटना उघडकीस आली आहे. सोने आभूषण घेऊन घराकडे परतणाऱ्या एका वयोवृद्ध दाम्पत्याच्या ऑटोतून अज्ञात दोन युवतींनी अंदाजे १ लाख ३९ हजार रुपयांचा सोन्याचा गोप लांबवला.
नवजीवन कॉलनीतील वृद्ध दाम्पत्य ठरले टार्गेट
६८ वर्षीय लक्ष्मण गंगाराम रामटेके हे आपल्या पत्नीसोबत बागडे ज्वेलर्स येथून मुलीने तयार केलेले १४ ग्रॅम वजनाचे सोने आभूषण घेऊन ऑटोरिक्षातून घरी जात होते. गाडगे बाबा मंदिराजवळ, प्रवासादरम्यान दोन अनोळखी युवती त्यांच्या ऑटोत बसल्या. काही अंतरावर त्या दोघी उतरून निघून गेल्या.
घरी पोहचल्यावर उघड झाली चोरी
रामटेके यांच्या पत्नीने घरी पोहोचल्यावर पर्स तपासली असता सोन्याचा गोप गायब असल्याचे लक्षात आले. या घटनेमुळे दाम्पत्याला मोठा आर्थिक फटका बसला आहे.
गाडगे नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
या प्रकरणी लक्ष्मण रामटेके यांनी गाडगे नगर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात दोघींविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे.
सीसीटीव्ही आणि रिक्षा ड्रायव्हरचा शोध
या प्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व ऑटोचालकाचा शोध सुरू केला आहे. अशा प्रकारे ऑटोत बसून चोरी करणाऱ्या टोळ्यांचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.