टाकरखेडा संभू येथे राजीव गांधी कृषिरत्न पुरस्कार सोहळा संपन्न
टाकरखेडा संभू -राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठान, अमरावती आणि आयडियल ॲग्री सर्च प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने खरीपपूर्व शेतकरी संवाद आणि राज्यस्तरीय राजीव गांधी कृषिरत्न पुरस्कार वितरण सोहळा टाकरखेडा संभू येथे मोठ्या उत्साहात पार पडला. पौर्णिमा ॲग्रो बायोटेकच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्षपद माजी सरपंच दीपक पाटील यांनी भूषवले.
गेल्या १९ वर्षांपासून नाविन्यपूर्ण शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव करण्याचा प्रतिष्ठानचा उपक्रम यंदाही प्रभावीपणे राबविण्यात आला. यानुसार दिनांक २५ मे रोजी टाकरखेडा संभू येथे झालेल्या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात रूपाली वसंतराव ठाकरे (मुख्यालय: टाकरखेडा संभू) यांचा ‘उत्कृष्ट शेतकरी मित्र कृषी अधिकारी’ म्हणून, संतोष शेंडे, अध्यक्ष, भातकुली तालुका मराठी पत्रकार संघ यांचा ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार’, राजाभाऊ लुंगे (अमरावती) यांचा कृषीपूरक उद्योगासाठी, तसेच सुरेंद्र लांजेवार (पोहरा पूर्णा) यांचा उत्कृष्ट तीफणकरी म्हणून गौरव करण्यात आला.
या वेळी राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश साबळे यांनी शेतकऱ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करताना त्यांच्या कार्याचा गौरव केला. “पुरस्कार हा केवळ सन्मान नसून पुढील कार्यासाठीची नवी दिशा आहे,” असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी राज्यातील विविध भागांतून आलेल्या शेतकऱ्यांच्या कार्याचे कौतुक केले.
कार्यक्रमात वैभव जाधव (आयडियल ॲग्री सर्च प्रा. लि.) यांनी शेतकऱ्यांना खरीप हंगामातील मृदा परीक्षण, खतांची मात्रा, बियाण्यांची निवड, बीजप्रक्रिया आणि सूक्ष्म मूलद्रव्यांच्या वापराबाबत मार्गदर्शन केले. झोनल मॅनेजर भिवसन बकाल यांनीही आपल्या अनुभवातून शेतकऱ्यांना उपयुक्त माहिती दिली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोर्णिमा सवाई (जिजामाता कृषी भूषण पुरस्कार विजेती) यांनी केले, तर सूत्रसंचालन गोपाल कडू यांनी केले. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी आभारप्रदर्शन तालुका कृषी अधिकारी उत्कर्षा भोसले यांनी केले.
कार्यक्रमाला सरपंच रश्मी देशमुख, उपसरपंच प्रदीप शेंडे, कृषी पर्यवेक्षक अमोल सराड, वैभव कुमार जाधव (ऑल इंडिया डेव्हलपमेंट हेड, आयडियल ॲग्री सर्च), भिवसन बकाल झोनल मॅनेजर आयडियल ॲग्री सर्च प्रा. लि., गणेश बकाल एरिया सेल्स मॅनेजर आयडियल ॲग्री सर्च प्रा. लि., दिलीप काळे, भैय्यासाहेब निचळ, ग्रा. सदस्य सोनाली जामठे ,कल्याणी सवाई, विद्या शेंडे, छाया सवाई, राहुल तायडे, विवेक मोहोड, सौरभ मानकर, अतुल भुस्कडे, गजानन कडू, रामदास लांडगे, अशोकराव शेंडे, हिम्मतराव काळे, राजू निमकर, वृजेश सवाई, प्रशांत ठाकरे, बल्लू पाटील, अनुउल्ला खान ,रोशन ठाकरे, तसेच या सोहळ्यात शेतकरी, अधिकारी ,सामाजिक कार्यकर्ते व गावातील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.