“नागपूरमध्ये घातक शस्त्रासह इसम अटकेत; कळमना पोलिसांची कारवाई”
नागपूर : कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत घातक शस्त्रासह फिरणाऱ्या एका व्यक्तीस पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याविरोधात भारतीय हत्यार कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, दिनांक २५ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजल्यापासून दुपारी १२.३० वाजेपर्यंत कलमणा पोलीस तपास पथक हद्दीत पेट्रोलिंग करत असताना, त्यांना गोपनीय माहिती मिळाली की, चिखली झोपडपट्टी, मालखाना रोड, कलमणा परिसरात एक इसम हातात शस्त्र घेऊन फिरत आहे.
पोलिसांनी तत्काळ नमूद ठिकाणी धाव घेतली असता, एक इसम हातात स्टीलचे पाते आणि काळसर मुठ असलेला चाकू घेऊन शिवालीक करताना आढळून आला. पोलिसांनी त्याला घटनास्थळीच शिताफीने ताब्यात घेतले. तपासादरम्यान, त्याचे नाव परमेश्वर उर्फ भांडु गोपाल शाह (वय २५ वर्षे, रा. टिळी सिंघल, कुंभारे मोहल्ला, नागपूर) असे असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी त्याच्याजवळील अंदाजे ५०० रुपये किमतीचा चाकू जप्त केला आहे. तपासात उघडकीस आले की, सदर इसम शस्त्रबंदीच्या कालावधीत घातक शस्त्र बाळगत होता. याप्रकरणी कलमणा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध कलम ४/२५ भारतीय हत्यार कायदा आणि कलम १३५ महाराष्ट्र पोलीस कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी आरोपीस अटक केली असून, पुढील तपास सुरु आहे.