माहूरमध्ये बनावट खतांचा सुळसुळाट; चढ्या दराने विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक
माहूर : श्रीक्षेत्र माहूर परिसरात अंध्रप्रदेश व तेलंगणातील काही बनावट खत उत्पादक कंपन्या व दलालांनी हातमिळवणी करत शेतकऱ्यांची फसवणूक सुरू केली आहे. बनावट आणि परवानगी नसलेली खते थेट वाहनाने घरपोच पोचवून चढ्या दराने विक्री केली जात आहे.
या प्रकरणात शेकापूर येथील शेतकरी सोमनाथ चव्हाण यांच्या गळाला बनावट खत विकून १० पोत्यांची जबरदस्तीने खरेदी करवून त्यांची फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांनी आपली व्यथा सार्वजनिकपणे मांडत, इतर शेतकऱ्यांनाही सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
कृषी विभागाचे दुर्लक्ष?
या प्रकारामुळे तालुका कृषी अधिकारी कार्यालय आणि पंचायत समितीतील कृषी विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष चव्हाट्यावर आले आहे. बनावट खत विक्रीसंदर्भात कोणतीही कारवाई न झाल्यामुळे दलालांचे फावते आहे आणि शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान वाढत आहे.
शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट
या फसवणुकीमुळे तालुक्यातील शेतकरी वर्गात तीव्र संताप असून, बनावट खत विक्री करणाऱ्यांविरुद्ध तातडीने कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. तसेच, बनावट खतांचा साठा जप्त करून संबंधितांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी जोरदार मागणी शेतकरी संघटनांकडून केली जात आहे.