अचलपूरमध्ये मिल कर्मचाऱ्यांचे वेतनासाठी शोले स्टाईल आंदोलन
अमरावती : अमरावतीतील फिनले मिल या एकेकाळच्या यशस्वी असलेल्या पण सध्या अडचणीत सापडलेल्या औद्योगिक आस्थापनात थकीत पगाराच्या समस्येवरून कामगारांचा संताप शिगेला पोहोचला आहे. कामगार मनोज सूर्यवंशी आणि विकेश यांनी आपल्या थकीत पगारासाठी थेट कारखान्याच्या उंच चिमणीवर चढून आंदोलन करत प्रशासनाला हादरवून सोडले आहे.
जीवघेणी कृतीने दिला प्रशासनाला इशारा
गेल्या अनेक महिन्यांपासून थकीत पगाराच्या समस्येला कंटाळून कामगारांनी वेळोवेळी तक्रारी केल्या, आंदोलन केले, परंतु त्याकडे दुर्लक्ष झाल्याने अखेर “आमच्या पोटाचा प्रश्न आहे!” असे म्हणत त्यांनी ही अत्यंत धोकादायक व आत्मघातकी पावले उचलली.
प्रशासनाची धावपळ सुरू
कामगार चिमणीवर चढताच प्रशासन, पोलीस यंत्रणा व अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. कामगार खाली उतरावेत म्हणून समजूत घालण्याचे प्रयत्न सुरू असून, “पगार मिळेपर्यंत खाली येणार नाही”, असा कामगारांचा ठाम पवित्रा आहे.
कामगारांचे आरोप:
गेल्या अनेक महिन्यांपासून पगार थकीत
वेळोवेळी प्रशासनाला निवेदने, मागण्या केल्या
कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने आंदोलनाची वेळ
“आम्ही मरतोय, पण कोणी ऐकत नाही!” – आक्रोश
कामगार संघटनांचा पाठींबा
स्थानिक कामगार संघटनांनीही या आंदोलनाला पाठींबा दिला असून, जर वेळेत पगाराचे समाधानकारक उत्तर मिळाले नाही, तर मोठ्या प्रमाणावर फिनले मिलमध्ये काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.
कामगार चिमणीवर चढल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. “कामगारांना इतकं का वेठीस धरण्यात येतं?” असा सवाल आता उपस्थित होतो आहे.