तापत्या उन्हापासून नागरिकांना दिलासा, चक्क मे महिन्यात पावसाची हजेरी

अमरावती : आपल्याला सर्वांना माहीत आहे की मे महिना हा उन्हाळ्यातील सर्वात उष्णतेचा कालावधी मानला जातो. मात्र यंदाच्या मे महिन्याने अपवाद ठरवत संपूर्ण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. मागील चार ते पाच दिवसांपासून राज्यात पावसाने हजेरी लावली असून, मंगळवारी 27 मे रोजी अमरावती शहरातही मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस कोसळला.
या पावसामुळे प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या अमरावतीकरांना दिलासा मिळाला असून, शहरात काही प्रमाणात गारवा जाणवला. हवामान विभागाच्या माहितीनुसार, या मे महिन्यामध्ये 100 मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली असून, ही संख्या सरासरीहून खूपच जास्त असल्याचे स्पष्ट झाले आहे.
यासोबतच हवामान विभागाने पुढील अंदाज वर्तवताना सांगितले आहे की, येत्या जून महिन्यामध्येही समाधानकारक पावसाची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग, नागरिक आणि प्रशासन यांनी योग्य ती तयारी ठेवण्याचं आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आलं आहे.