नांदेड बनावट जन्म दाखला प्रकरण..किरीट सोमय्या यांनी दिली पोलीस ठाण्याला भेट..

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील बनावट जन्म दाखला प्रकरणाने राज्यात खळबळ माजवली आहे. या प्रकरणात स्थानिक नेत्यांसह काही अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा संशय भाजप नेते किरीट सोमय्या यांनी व्यक्त केला आहे. सोमय्या यांनी आज अर्धापूर ग्रामीण रुग्णालय आणि स्थानिक पोलीस ठाण्याला भेट देत या प्रकरणाची सखोल माहिती घेतली.
८२ बनावट जन्म दाखल्यांचा प्रकार उघड
अर्धापूर ग्रामीण रुग्णालयातून तब्बल ८२ बनावट जन्म दाखले देण्यात आल्याची धक्कादायक बाब काही दिवसांपूर्वी समोर आली होती. हा संपूर्ण प्रकार पुणे येथील पासपोर्ट कार्यालयाच्या सतर्कतेमुळे उजेडात आला. यानंतर अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बनावट सही व शिक्क्यांचा वापर
या प्रकरणात रुग्णालयातील एका कंत्राटी कर्मचाऱ्याने नगर पंचायतच्या मुख्याधिकाऱ्यांची बनावट सही व शिक्के वापरून बनावट जन्म दाखले तयार केल्याचा आरोप आहे. त्यामुळे या घोटाळ्यात प्रशासकीय दुर्लक्ष, भ्रष्टाचार आणि राजकीय हस्तक्षेपाची शक्यता वर्तवली जात आहे.
किरीट सोमय्या यांचा दावा
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं की,
“या बनावट जन्म दाखल्यांच्या प्रकरणात स्थानिक नेते व अधिकारी सामील असण्याचा संशय आहे. हे केवळ रुग्णालयपुरते प्रकरण नाही, तर यामध्ये मोठं रॅकेट कार्यरत आहे. येत्या १० दिवसांत या प्रकरणात मोठा खुलासा होईल.”
ते पुढे म्हणाले की, “या प्रकरणाचा बांगलादेशी घुसखोरीशी संबंध आहे का, हे तपासाअंती उघड होईल.”