नालीची साफसफाई मे अखेरपर्यंत पुर्ण करा उपायुक्त मेघना वासनकर यांचा अधिका-यांना निर्देश

अमरावती : पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थिती उद्भवणार नाही, यासाठी शहरातील नालीसफाई व गटारांची सर्व कामे मे अखेरपर्यंत पूर्ण करावीत. तसेच संभाव्य पूरपरिस्थितीत कोणतीही घटना घडल्यास संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून, संबंधीत विभागांनी समन्वयाने परिस्थिती हाताळावी, असे निर्देश महापालिका उपायुक्त डॉ.मेघना वासनकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
मंगळवार दिनांक २७ मे,२०२५ रोजी उपायुक्त डॉ.मेघना वासनकर यांनी यशोदा नगर, चवरे नगर, नमुना गल्ली परिसरातील नालीची पाहणी केली. पावसाळ्यातील समस्या व आपत्कालीन परिस्थितीबाबत चर्चा करण्यात आली. स्वच्छता विभागांच्या कामकाजाचा आढावा आणि नियोजनाबद्दल उपायुक्तांनी माहिती घेतली. त्यावेळी त्यांनी में अखेरपर्यंत पावसाळ्यापूर्वीची कामे करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
उपायुक्त डॉ.मेघना वासनकर म्हणाल्या की, पूर परिस्थितीत तातडीने घटनास्थळावर पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणावी. पूर परिस्थिती सहजतेने हाताळण्यासाठी संबंधीत विभागांनी अंतर्गत समन्वय ठेवावा. नाली सफाईच्या कामांना गती द्या, कोठेही पाणी तुंबणार नाही याची काळजी घ्यावी. सदर परिसरात स्वच्छतेबाबत लक्ष ठेवून, नालीची सफाई होत आहे की नाही याची सातत्याने पाहणी करावी. आपत्ती काळात त्वरित संपर्कासाठी आवश्यक यंत्रणांचे संपर्क क्रमांक अद्ययावत ठेवावेत. हेल्पलाइन क्रमांक व वायरलेस यंत्रणा २४ तास सक्रिय ठेवावी. धोकादायक होर्डिंग आणि इमारतींची पाहणी करून काढून टाकाव्यात.
या पाहणी दरम्यान सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर, अतिक्रमण पथक प्रमुख श्याम चावरे, स्वास्थ अधिक्षक श्रीकांत डवरे, स्वास्थ निरीक्षक, मनपा कर्मचारी, सफाई कामगार उपस्थित होते.