मोर्शी आगारात ५ नव्या एस.टी. बससेवांचा शुभारंभ; प्रवाशांना दिलासा

मोर्शी : मोर्शी आगारातून आजपासून ५ नवीन एस.टी. बससेवा सुरू करण्यात आल्या असून, यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांसह विद्यार्थी, महिला, शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रवासाच्या सोयीसाठी मोठा दिलासा मिळणार आहे. याआधी आगारात ३३ बस कार्यरत होत्या, तर आता हा आकडा ३८ वर पोहोचला आहे.
या उपक्रमासाठी गेल्या काही महिन्यांपासून स्थानिक स्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. अखेर या प्रयत्नांना यश येत, पहिल्या टप्प्यात मंजूर झालेल्या १० बसपैकी ५ बस मोर्शी आगारात दाखल झाल्या असून, आज त्यांचा भव्य लोकार्पण सोहळा पार पडला.
यावेळी बोलताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, उर्वरित ५ बसेस तसेच नव्याने मंजूर करण्यात आलेल्या इलेक्ट्रिक बसेस डिसेंबरअखेरपर्यंत प्रवाशांच्या सेवेत दाखल होतील.
या महत्त्वाच्या उपक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार, महसूलमंत्री मा. चंद्रशेखरजी बावनकुळे आणि परिवहनमंत्री मा. प्रतापजी सरनाईक यांचे विशेष आभार मानण्यात आले.
लोकार्पण सोहळ्याला परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी, डेपो मॅनेजर, कर्मचारीवर्ग, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामुळे मोर्शीतील जनतेमध्ये समाधान आणि उत्साहाचे वातावरण होते.
प्रवाशांसाठी दिलासा – विकासाच्या दिशेने पाऊल
या नव्या बससेवेमुळे मोर्शी तालुक्यातील अंतर्गत भागांमध्ये सार्वजनिक वाहतुकीचा दर्जा सुधारेल, तसेच नागरी आणि ग्रामीण भागातील संपर्क अधिक सक्षम होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.