Amravati Airport : उड्डाणापूर्वी घडले अजबच; पेट्रोल न मिळाल्याने अमरावती मुंबई विमान फेरी रद्द, प्रवासी संतप्त
अमरावती : मागील महिन्यातच उद्घाटन होऊन विमान सेवा सुरु झालेल्या अमरावती विमानतळावर अजबच प्रकार झाला आहे. अमरावतीहुन मुंबईसाठी उड्डाण करणाऱ्या विमान फेरी ऐनवेळी रद्द करण्याची वेळ आली आहे. विमानामध्ये पेट्रोल भरणारे टँकर अमरावती विमानतळावरील मातीत फसल्याने विमानासाठी पेट्रोल मिळू शकले नाही. परिणामी सोमवारी अमरावती ते मुंबई विमान फेरी ऐनवेळी रद्द करण्यात आली. यामुळे त्यामुळे प्रवाशांचा संताप अनावर झाला होता.
बहुप्रतीक्षित असलेल्या अमरावती विमानतळाचे मागील महिन्यात १७ एप्रिलला उद्घाटन करण्यात आले. यानंतर याठिकाणाहून मुंबईसाठी विमानसेवेचा शुभारंभ करण्यात आला आहे. विमानसेवा सुरु होण्यास दीड महिन्यांचा कालावधी झाला असताना याठिकाणी एका वेगळ्याच कारणाने मुंबईसाठीची विमान सेवा रद्द करावी लागली आहे. यामुळे मुंबई जाणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला.
पेट्रोल अभावी उड्डाण रद्द
अमरावती विमानतळावरून नेहमीप्रमाणे सायंकाळी साडेचारच्या सुमारास ७४ प्रवासी विमानाने मुंबईला जाणार होते. सुरुवातीला पायलटने सर्व प्रवाशांना विमानात बसण्याची परवानगी दिली. प्रवाशांनी आपले सीटबेल्ट सुद्धा बांधले. उड्डाणापूर्वी अमरावती विमानतळावर टँकरद्वारे विमानात पेट्रोल भरले जाते. मात्र, सोमवारी पेट्रोलचा टँकर मातीत फसला. पर्यायाने नियोजित वेळेत विमानात पेट्रोल भरता आले नाही.
सर्व प्रवाशांना उतरावे लागले खाली
दरम्यान पायलट कॉकपीटमधून बाहेर आला आणि त्याने सर्व प्रवाशांना विमानाखाली उतरण्यास सांगितले. तोपर्यंत सायंकाळ झाल्याने आणि नाईट लँडिंगची सुविधा नसल्यामुळे विमान उड्डाण करणार असल्याचे त्याने प्रवाशांना सांगितले. यामुळे प्रवाशांमध्ये संताप अनावर झाला होता. अनेकांनी विमानतळ प्राधिकरण आणि संबंधित अधिकाऱ्यांशी वाद घालणे सुरू केले. मात्र, त्याचा काही एक फायदा झाला नाही. मात्र याचा मोठा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागला.