अकोल्यातील युवकाचा पावसात सायकलवरून घसरून दुर्दैवी मृत्यू
अकोला – शहरातील भगतसिंग चौक, माळीपुरा परिसरात राहणारे रोहित धर्मराज संदलकर (वय अंदाजे ३५) यांचा मंगळवारी सायंकाळी दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना अग्रसेन चौक येथे घडली असून, तीमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
पावसामुळे पाण्याचा अंदाज न आल्याने घसरले सायकल
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास रोहित संदलकर हे आपल्या दैनंदिन कामानंतर घरी परतत असताना अचानक वादळी वाऱ्यासह पावसाची सुरुवात झाली. अग्रसेन चौकात गतिरोधकाजवळ पाणी साचल्याने त्यांना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते सायकलवरून घसरून खाली पडले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
अपघात की नैसर्गिक आपत्ती? तपास सुरू
ही घटना नेमकी अपघात मानायची की नैसर्गिक आपत्तीत समाविष्ट करायची, यासंदर्भात रामदास पेठ पोलीस तपास करत आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
कुटुंबीयांची मदतीची मागणी
रोहित संदलकर यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार असून, ते हातमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. या दुर्दैवी घटनेनंतर कुटुंबीयांनी शासनाच्या नैसर्गिक आपत्ती मदत निधीमधून आर्थिक मदतीची मागणी केली आहे. “घटनेची चौकशी करून न्याय मिळावा,” अशी भावना त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली आहे.