अचलपूर फिनले मिलमध्ये 36 तासांपासून कामगारांचं चिमणीवर आंदोलन सुरूच !

अचलपूर – अचलपूर तालुक्यातील फिनले मिलमध्ये कामगारांनी सुरू केलेले आंदोलन आता चिघळताना दिसत आहे. मागील 36 तासांपासून मनोज सूर्यवंशी आणि विकेश उघडे हे दोन कामगार चक्क मिलच्या चिमणीवर 200 फूट उंचीवर आंदोलन करत असून अद्यापही खाली उतरलेले नाहीत. यामुळे त्यांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला आहे.
प्रशासनाची घटनास्थळी भेट, पण ठोस निर्णय नाही
ठाणेदार मेहत्रे आणि तहसीलदार डॉ. संजय घरकुल यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची माहिती घेतली. मात्र, पिल्ले मिलचे महाप्रबंधक अमित कुमार सिंह यांना देण्यात आलेल्या कामगारांच्या निवेदनानंतरही NTC दिल्लीकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया, पत्रव्यवहार अथवा फॅक्स आलेले नाही.
कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष?
कामगारांनी दिलेल्या निवेदनानुसार, त्यांची मागणी संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आली असली तरी नॅशनल टेक्स्टाईल कॉर्पोरेशन (NTC) कडून अभीपर प्रतिक्रिया न आल्यामुळे आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
जनप्रतिनिधींचं गायब राहणं खटकतंय
या गंभीर आंदोलनाला कोणत्याही स्थानिक जनप्रतिनिधीने अद्याप भेट दिलेली नाही, यामुळे कामगारांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. “आमचं आरोग्य आणि भविष्य यांची चिंता कोणीही करत नाही,” अशी भावना आंदोलनकर्त्या कामगारांकडून व्यक्त केली जात आहे.
प्रतिनिधी – नितेश किल्लेदार