आश्वासन समितीच्या बैठकीत निर्णय , मिठी नदीतील घोटाळ्याची सखोल चौकशी होणार
मुंबई : विधानभवनात आयोजित आश्वासन समितीच्या महत्त्वपूर्ण बैठकीत मिठी नदीच्या खोलीकरणातील कोट्यवधींच्या घोटाळ्याची सखोल चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासोबतच, १२ मिल जागेच्या आयटी चटई क्षेत्रात अनधिकृत पब, बार आणि रेस्टॉरंट्स उभारून बिल्डरांनी केलेल्या बेकायदेशीर बळकावणीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
समितीचे अध्यक्ष आमदार रवी राणा यांनी स्पष्ट शब्दांत या प्रकरणांत कारवाईचे संकेत दिले असून, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या अध्यक्षतेखाली IT एक्स्पर्ट्स आणि IT विद्यार्थ्यांच्या सहभागाने विशेष समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.
मिठी नदीत १८६ कोटींच्या जागी ५३४ कोटींचं काम; घोटाळ्याची चौकशी
मिठी नदीच्या खोलीकरण, गाळ काढणे, रुंदीकरण आणि दोन्ही बाजूंच्या संरक्षण भिंतीच्या सिमेंट कॉनक्रिट कामांमध्ये अनियमितता झाल्याचे समोर आले आहे. पहिला टेंडर सुमारे १८६ कोटी रुपयांचा होता. मात्र, त्याच कंत्राटदाराला ५३४ कोटींचं दुसरं कंत्राट देण्यात आल्याने शंका व्यक्त होत आहे.
आ. रवी राणा यांच्या अध्यक्षतेखालील समितीने यासंदर्भात सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.
१२ मिल जागेवर IT क्षेत्राऐवजी बार-पब उभारले; समितीची कारवाईचे संकेत
बैठकीत १२ मिल जागेच्या वापराबाबत अत्यंत गंभीर माहिती समोर आली. IT चटई क्षेत्रासाठी राखीव असलेल्या जागेवर पब, बार, रेस्टॉरंट उभारण्यात आले असून बिल्डरांनी मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केला असल्याचा आरोप करण्यात आला.
या प्रकरणावर गंभीर दखल घेत, आ. रवी राणा यांनी आयुक्त अभिजित बांगर यांच्या नेतृत्वात समिती स्थापन करून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित १२ मिल प्रकल्पस्थळी प्रत्यक्ष भेटी देण्यात येणार आहेत.
समितीचा निर्णय: लीज जमिनीतील १२० कोटींचा ‘हेड’ निर्माण करणार
मनपाच्या १२४ लीज जमिनींतून शासनाला मिळणाऱ्या १२० कोटी रुपयांचा स्वतंत्र ‘हेड’ निर्माण करण्याचा निर्णय आश्वासन समितीत घेण्यात आला.
उच्चस्तरीय उपस्थिती; ५८ विवरणपत्रांवर चर्चा
विधानभवनाच्या ७ व्या मजल्यावर झालेल्या बैठकीत नगरविकास विभागाच्या ५८ विवरणपत्रांचे वाचन झाले. या बैठकीत प्रमुख उपस्थिती:
आ. राजेश पवार, आ. पराग शाह, आ. हिरामण खोसकर, आ. विक्रम पाचपुते, आ. अनुप अग्रवाल, आ. अमोल पाटील
बृहन्मुंबई मनपा आयुक्त अभिजित बांगर, अप्पर आयुक्त विपीन शर्मा
उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त मनिषा आव्हाळे, कल्याण डोंबिवली आयुक्त अभिनव गोयल, पुणे मनपा अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी
वॉर्ड अधिकारी एन वॉर्ड विशाल म्हैस्कर, सह आयुक्त गजानन बेल्हाळे
नगरविकास सहसचिव विद्या हंपया, उप सचिव प्रियांका छापवाले, उप सचिव सचिन सहस्त्रबुद्धे, सहसचिव सुलेखा वैजापूरकर, उप सचिव निर्मल कुमार चौधरी
विधानसभा सहसचिव नारायण थिटे, तहसीलदार हिरेश शाह, कक्ष अधिकारी म्हात्रे
मनपा, नगरविकास व विधानसभा विभागांचे वरिष्ठ अधिकारी
आ. रवी राणा ऍक्शन मोडवर!
बैठकीदरम्यान आ. रवी राणा यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “सार्वजनिक निधीचा अपव्यय आणि जमिनी बळकावणी यावर कुठलीही तडजोड होणार नाही. दोषींवर कारवाई अनिवार्य आहे.”