ऑक्सिजन पार्कच्या शेजारीच कचऱ्याचे ढिगारे! आरोग्याचा सवाल अन उत्तरदायित्वाचे दुर्लक्ष
अमरावती – शहरातील ऑक्सिजन पार्क म्हणजे सकाळी शुद्ध हवा घेण्यासाठी नागरिकांची पहिली पसंती. मात्र, याच पार्कच्या अगदी शेजारी कचऱ्याचे ढिगारे, मरण पावलेली जनावरे, आणि घरगुती कचऱ्याचे उघड्यावर ढीग यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. संत गजानन शाळा, उच्चभ्रू कॉलनी आणि यशोदानगर व वडाळी मार्ग या साऱ्या परिसरातील नागरिक अक्षरशः नाकावर रुमाल धरून चालतात.
मान्सूनपूर्व पावसाने परिस्थिती आणखी बिघडली
गेल्या अनेक महिन्यांपासून ही परिस्थिती कायम असून, मनपा प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. आता तर मान्सूनपूर्व पावसाने या ढिगाऱ्यांमुळे दुर्गंधीची तीव्रता वाढली असून परिसर आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक बनला आहे. वडाळी नाल्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे डम्पिंग यार्ड असल्याचे दृश्य दिसते.
शुद्ध हवा नाही, दुर्गंधीचा श्वास
सकाळी मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. लहान मुलांच्या शाळा आणि रहिवासी वसाहती शेजारी इतक्या प्रमाणात कचरा असणे ही मनपा प्रशासनाच्या निष्क्रियतेचे प्रतीक असल्याचे नागरिक बोलून दाखवत आहेत.
नागरिकांचा सवाल – मनपा प्रशासनाला जाग येणार कधी?
“हे डम्पिंग यार्ड नाही, पण दिसते तसेच आहे,” असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. यासंदर्भात प्रशासनाने त्वरित कचरा व्यवस्थापनाचे नियोजन करावे, अन्यथा जनआंदोलनाचा इशारा दिला जात आहे.