शेतात चारणाऱ्या म्हशी वर वीज कोसडल्याने शेतकऱ्याला आर्थिक फटका
माधान (चांदूर बाजार) : चांदूर बाजार तालुक्यातील माधान गावाजवळील शेत परिसरात बुधवार, 27 मे रोजी दुपारी चार वाजता अचानक वीज कोसळून गर्भवती म्हशीचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेत शेतकरी किसनराव भारखडे यांचे अंदाजे 70 हजार रुपयांचे नुकसान झाले असून, त्यांनी प्रशासनाकडे नैतिक जबाबदारी स्वीकारून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.
दुहेरी आर्थिक फटका
मृत झालेली म्हैस अंदाजे नऊ महिन्यांची गर्भवती होती. त्यामुळे एकाच वेळी दोन जनावरांचे नुकसान झाल्याचे दु:ख भारखडे यांनी व्यक्त केले. या म्हशीवर त्यांचा उदरनिर्वाह अवलंबून होता. आता त्यांच्याकडे दुसरे कोणतेही उत्पन्नाचे साधन नाही.
अनर्थ टळला पण धोका कायम
दुर्घटनेबाबत शेतकरी किसनराव भारखडे यांनी माहिती देताना सांगितले की,
“माझा मुलगा राजू आणि बाळू जानराव मोहोड यांच्या शेतात म्हशी चारायला गेला होता. त्यावेळी अचानक वीज कोसळली आणि म्हशीवर घाला झाला. सुदैवाने माझा मुलगा आणि तिथे उपस्थित इतर शेतकरी थोडक्यात बचावले. मोठा अनर्थ टळला, पण आता भीतीचे वातावरण आहे.”
स्थानिक प्रशासनाकडे मदतीची अपेक्षा
या दुर्घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी भारखडे यांच्या मदतीसाठी प्रशासनाने तत्काळ पावले उचलावीत, अशी मागणी केली आहे. या प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वीज वितरण कंपनीने देखील आवश्यक ती काळजी घ्यावी, असेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे.