अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार; यवतमाळजवळ राष्ट्रीय महामार्गावरील घटना
यवतमाळ — नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर पेंटर बाबा दर्ग्याजवळ आज सकाळी एक दुर्दैवी घटना घडली. नांदेडहून यवतमाळकडे जाणाऱ्या लेनवर एका अज्ञात वाहनाने एका चार ते पाच महिन्यांच्या बिबट्याला जोरदार धडक दिली, यात बिबट्याचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीद्वारे दिली, त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर महामार्गावर मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. बिबट्याचा मृतदेह पाहण्यासाठी नागरिकांनी रस्त्यावरच थांबून मोबाईलमधून व्हिडिओ व फोटो काढले.
वनविभागाकडून माहितीप्रमाणे, मृत बिबट हा चार ते पाच महिन्यांचा असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तो कदाचित रान परिसरातून भटकून महामार्गावर आला असावा, असे प्राथमिक निरीक्षण आहे.
काय आहे पुढील कारवाई?
वनविभागाकडून बिबट्याच्या मृतदेहाची तपासणी करून पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात येणार आहे. तसेच, या अपघाताची नोंद घेत वाहन शोधण्याचे काम पोलीस व वनविभागाच्या संयुक्त पथकाकडून सुरू आहे.
नागरीकांची मागणी:
या परिसरात अनेक वेळा वन्य प्राण्यांचे रस्त्यावर येणे वाढले असून, महामार्गांवर वन्यजीवांसाठी सूचना फलक, स्पीड ब्रेकर आणि सतर्कता उपाय यांची मागणी नागरिक करत आहेत.