अकोल्यात बंद घरात आढळला युवकाचा मृतदेह

अकोला : अकोला शहरातील खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पेन्शनपुरा परिसरात एका बंद घरामधून दुर्गंधी येत असल्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला असता, एका युवकाचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
दुर्गंधीमुळे उघडकीस आली घटना
आज दुपारच्या सुमारास पेन्शनपुरा भागातील एका घरातून तीव्र दुर्गंधी येत असल्याचे स्थानिकांनी लक्षात घेतले. त्यांनी याची माहिती खदान पोलीस स्टेशनला दिली. तत्काळ घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी कुलूप बंद असलेले घर उघडून तपासणी केली, तेव्हा घरात एका युवकाचा मृतदेह सापडला.
मृतकाची ओळख – 23 मे पासून होता बेपत्ता
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृतकाचे नाव कुणाल किशोर कमलकर (वय अंदाजे 25) असल्याची शक्यता आहे. तो 23 मेपासून बेपत्ता होता, आणि याबाबत त्याच्या नातलगांनी खदान पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही दाखल केली होती.
सदर घर मृतकाच्या काकाचे असल्याचे तपासात उघड झाले असून, पोलिसांनी त्याच्या काकाला ताब्यात घेतले आहे. मृतदेह 3 ते 4 दिवस जुना असून पूर्णपणे डी-कंपोज झाल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला
मृतदेह अधिक तपासासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, अकोला येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे.
काय घडलं नेमकं? – शवविच्छेदन अहवालावर अवलंबून
या घटनेमागे नेमकं कारण काय, मृत्यू नैसर्गिक आहे की हत्या, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच खरी कारणमीमांसा होणार आहे, असे खदान पोलिसांनी सांगितले.