अमरावतीमध्ये कोरोनाचा शिरकाव, ५६ वर्षीय महिलेला लागण
अमरावती शहरात कोरोनाचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील 56 वर्षीय महिलेला श्वास घेण्यास त्रास जाणवल्याने तिने तपासणी केली, आणि तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या या महिलेवर गृहविलेगीकरणात उपचार सुरू आहेत.
आरोग्य विभाग आणि महानगरपालिकेचे पथक तातडीने सक्रिय झाले असून, पॉझिटिव्ह आलेल्या महिलेच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात आला आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींचा शोध घेतला जात आहे, जेणेकरून संसर्गाचा फैलाव रोखता येईल.
कोरोनाच्या संभाव्य लाटेचा धोका लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाने तातडीने पाऊले उचलली आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना चाचणीची सुविधा पुन्हा एकदा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासोबतच, कोणत्याही गंभीर परिस्थितीचा सामना करण्यासाठी रुग्णालयात दहा खाटांचा कोरोना वॉर्ड तयार करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे यांनी दिली आहे.