ऑपरेशन प्रस्थान’चे राज्याच्या कॅबिनेट बैठकीत सादरीकरण करणार – पालकमंत्री संजय राठोड
यवतमाळ : यवतमाळचे पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांच्या संकल्पनेतून जिल्हा पोलिस दलाच्यावतीने राबविण्यात येत असलेले ‘ऑपरेशन प्रस्थान’ मुली व महिलांचा आत्मविश्वास वाढविण्यासोबत बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन देणारे अतिशय उपयुक्त अभियान आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या अभियानाचे सादरीकरण करुन राज्यातील सर्व मंत्र्यांना आपापल्या जिल्ह्यात हे अभियान राबविण्याची विनंती करु, असे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.
जिल्हा पोलिस दलाच्यावतीने ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत मुलींसाठी आयोजित कराटे प्रशिक्षण शिबिराच्या समारोप प्रसंगी पालकमंत्री बोलत होते. पोलिस कवायत मैदानावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश बैसाने यांच्यासह पोलिस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
समाजात अजूनही अप्रिय घटना घडत असतात. या घटना मन सुन्न करणाऱ्या आहे. महिला, मुलींना आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण दिल्यास त्या स्वत:च स्वत:चे संरक्षण करतील. जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी सामाजिक भावनेतून हे अभियान सुरु केले. रोजगार व सुरक्षेचे धडे देणारा हा उपक्रम राज्यात पथदर्शी उपक्रम ठरेल. महिला व मुलींचा आत्मविश्वास या उपक्रमाने वाढणार आहे असे ही पालकमंत्री राठोड म्हणाले.
जिल्ह्यात उपक्रमांतर्गत 1 हजार 700 मुलींना आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्याचे नियोजन होते. जिल्ह्यातील सर्वच विद्यार्थीनींना यात सामावून घ्या. 20 हजार मुलींचा यात समावेश करा. यासाठी लागणाऱ्या निधीची कमतरता भासणार नाही. ऑपरेशन प्रस्थान भविष्यात एक मोठी सामाजिक चळवळ होईल. राज्यस्तरावर याचे सादरीकरण करून संपुर्ण राज्यात हा उपक्रम कसा राबविता येईल, यासाठी प्रयत्न करून असे पालकमंत्री संजय राठोड म्हणाले.