नागपूर रेल्वे पोलिसांची मोठी कारवाई – ८.५ किलो गांजासह अंतरराज्यीय तस्कर अटक

नागपूर : २९ मे २०२५ रोजी रेल्वे पोलीस ठाणे, नागपूर यांनी मोठी कारवाई करत ८.५५ किलो गांजा व एक मोबाईल असा एकूण १,२८,२५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.ही घटना ११ एप्रिल २०२५ रोजी गोंडवाना एक्सप्रेस (गाडी क्र. १२४०९) मधील जनरल कोचमध्ये घडली. बाकड्याखाली एक निळ्या रंगाची बेवारस बॅग सापडली. पोलिसांनी बॅगची तपासणी केली असता त्यामध्ये गांजा आणि एक साधा मोबाईल आढळून आला.
अज्ञात आरोपीविरुद्ध NDPS अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला. तपासादरम्यान आरोपीने वापरलेल्या मोबाईलचा सीडीआर, एसडीआर व लोकेशन विश्लेषणाच्या आधारे, पोलिस पथक उडिसा राज्यातील जेपूर, जि. कोरापूर येथे रवाना झाले.तेथे डव्वरी कृष्णा विरप्रकाश शर्मा (वय ४९) या संशयित इसमाला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला नागपूर येथे आणून अटक करण्यात आली.
पोलीस आता या प्रकरणातील इतर साथीदार कोण आहेत आणि गांजा कोणत्या राज्यातून आणून कुठे पाठवला जात होता, याचा सखोल तपास करत आहेत.ही कारवाई पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, अप्पर पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड, उपविभागीय अधिकारी पांडुरंग सोनवणे, आणि प्रभारी पोनि गौरव गावंडे यांच्या नेतृत्वात सपोनि नीलम डोंगरे, पोहवा पुष्पराज मिश्रा, संजय पटले, किशोर ईश्वर, अजहर अली, व पोकॉ रोशन मोगरे यांनी केली आहे.