‘माफी मागा आणि विषय संपवा…’; सुदेश म्हशीलकरांच्या फेसबुक पोस्टनंतरही प्राची पिसाट ठाम

मराठी अभिनेत्री प्राची पिसाट हिने केलेल्या आरोपांवर अभिनेते सुदेश म्हशीलकर यांनी अखेर मौन सोडलं आहे. फेसबुक पोस्ट करत त्यांनी प्राचीच्या आरोपांचे खंडन केले आहे. मात्र सुदेश म्हशीलकर यांच्या या पोस्टवरही प्राचीने प्रत्युत्तर दिले आहे. प्राचीने पुन्हा एकदा एक स्क्रीनशॉट पोस्ट केला आहे. तसंच, या प्रकरणी म्हशीलकर यांनी माफी मागावी, असं म्हटलं आहे.
प्राचीने पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलं आहे?
नक्की माझा नंबर सेव्ह होता का नव्हता? फेसबुक अकाउंटचा अॅक्सेस होता? अकाउंट हॅक झाल्यानंतर हे तर गप्प का बसलेत? अकाउंट हॅक झाल्याचं एफबी फिडवर लगेच किंवा 5 दिवस पोस्ट का नाही केलं? चाट मध्येच मेसेजच्या खालीच अकाउंट हॅक झाल्याचा मेसेज का नाही केला?, असं प्राचीने म्हटलं आहे.
राहिला प्रश्न स्माइल इमोजीचा तर 50-60 वर्षाच्या माणसाचा अपमान करण्याऐवजी प्रत्येक मुलगी असाच रिप्लाय करून दुर्लक्ष करते आणि विषय संपवते. दुसऱ्यांदा पण दुर्लक्ष करते, मी पण तेच केलं. तुम्ही अजूनही माफी मागू शकतो आणि हा विषय संपवा. तसंच तुमचे फॅक्ट्स तपासून पाहा, पुर्ण चॅट कसा टाकणार? तुम्हीच मेसेज अनसेंड, डिलिट केले आहेत. म्हणून एवढच पोस्ट केलं, असं प्राचीने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
सुदेश म्हशीलकर यांनी पोस्टमध्ये काय म्हटलंय?
सुदेश यांनी केलेल्या एका पोस्टमध्ये त्यांनी म्हटलंय की, तो मेसेज माझ्याच अकाउंटवरून गेला आहे. पण तो नेमका केव्हा? कसा गेला? कोणीतरी अकाउंटमध्ये शिरलं का? की कुठे गैरवापर झाला? याचा मला पत्ता नाही. त्याबाबतीत मी लेखी तक्रार दाखल केली आहे, ती मी इथे जोडत आहे. आणि जर कुणी असं म्हणत असेल की त्यांनी माझं अकाउंट हॅक झालं का ते तपासलं, तर ती अतिशय गंभीर बाब आहे. माझं सोशल मीडिया अकाउंट ही माझी वैयक्तिक माहिती आहे त्यात परवानगीशिवाय हस्तक्षेप करणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे. तसंच, ‘सेक्सी’ म्हणावं असं खरं सौंदर्य आणि समजूत माझ्या आयुष्यातल्या अनेक मैत्रिणींमध्ये आहे. ज्या माझ्या पत्नीला सुद्धा ओळखतात. त्या आजही आवर्जून आमच्याकडे येतात, आणि माझ्या पत्नीच्या हातचं जेवण प्रेमाने खातात आपण जेव्हा एकत्र काम करत होतो तेव्हा तू सुद्धा तिच्या हातचं जेवलीयस. या सगळ्या गोष्टींबद्दल कुणाला काही तपासायचं असेल, कुणाला काही विचारायचं असेल तर माझी अजिबात हरकत नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.