माहूरगड रेणुकामाता घाटात वाहन खड्यात कोसळले – सहा भाविक किरकोळ जखमी
नांदेड: श्री क्षेत्र माहूर येथील श्री रेणुकामातेच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या वाहनाला अपघात झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. उत्तरारात्री २ वाजताच्या सुमारास रेणुकामाता मंदिराकडे जाणाऱ्या घाटरस्त्यावर वाहनाचा ताबा सुटून वाहन थेट खड्यात कोसळले. या अपघातात वाहनातील ६ भाविक किरकोळ जखमी झाले आहेत.
धामणगावमधील भाविकांचा अपघात:
अपघातग्रस्त वाहन एमएच 27 डीयु 1140 हे अमरावती जिल्ह्यातील धामणगाव तालुक्यातील मंगरुळ दस्तगीर येथून आलेल्या भाविकांचे होते. चालक सौरभ महेंद्र मारोडकर (वय 27) याचा मंदिरालगतच्या तीव्र वळणावर ताबा सुटल्याने गाडी खड्यात कोसळली.
जखमी भाविकांची नावे:
आकाश गजानन खालखुने (30)
योगेश सुरेंद्र चव्हाण (28)
रोशन शरद मारुळकर (33)
अक्षय हळदे (28)
भूषण पिंपळे (25)
चालक – सौरभ महेंद्र मारोडकर (27)
तत्काळ मदतकार्य – संस्थान आणि पोलिसांची तत्परता:
घटनेची माहिती मिळताच श्री रेणुका देवी संस्थानचे कार्यालयीन अध्यक्ष योगेश साबळे, व्यवस्थापक नितीन गेडाम, तसेच पोलीस स्टेशनचे पो.कॉ. ज्ञानेश्वर खंदारे व दत्ता सोनटक्के यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि सर्व जखमींना माहूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
प्रतिनिधी – गोपाल चव्हाण