शहरातील भटकंती समूहाचा त्रास वाढला, नागरिक त्रस्त

अमरावती : अमरावती शहराच्या मध्यवर्ती भागांमध्ये – राजकमल चौक, राजापेठ, जयस्तंभ चौक, मालवीय चौक आणि श्याम चौकातील उड्डाण पुलाखाली गेल्या अनेक महिन्यांपासून भटकंती समूहाने ठिय्या मांडल्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या भागांतून दररोज ये-जा करणाऱ्या नागरिकांवर मोबाईल हिसकावणे, पैसे मागणे, मारामारी करणे आणि गैरवर्तन करणे हे प्रकार रोजचेच झाले आहेत.
तक्रारींचा पाऊस – कारवाईचा पत्ता नाही!
गेल्या चार दिवसांपूर्वी एका इसमाचा मोबाईल हिसकावून मारहाण करण्यात आली, पोलिसांनी मोबाईल परत दिला तरी गुन्हा दाखल न झाल्याचे सिटी न्यूजला समजते. नागरिक वारंवार तक्रारी करत आहेत, मात्र पोलीस व महापालिका प्रशासन दृष्टिगोचर ठोस पावले उचलताना दिसत नाही.
नवा व्हिडिओ समोर – मजुरावर हल्ला
शुक्रवारी पुन्हा श्याम चौकातील उड्डाण पुलाखालील परिसरात एका मजुरावर हल्ला झाल्याचा व्हिडिओ सिटी न्यूजकडे दाखल झाला. दोन तरुणांनी त्याच्याकडून पैसे हिसकावण्याचा प्रयत्न केला. एक सजग नागरिक हा प्रकार मोबाईलमध्ये कैद करू लागला, तेव्हा त्या मुलांनी त्याच्या मागे धाव घेतली, यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
पोलीस निरीक्षक कोटनाके यांचं स्पष्टीकरण
या प्रकरणावर सिटी कोतवाली पोलीस निरीक्षक मनोहर कोटनाके यांच्याशी सिटी न्यूजने संपर्क साधला असता, “आधीही कारवाई करण्यात आली होती. आता पुन्हा डीबी पथक रवाना करून आरोपींचा शोध घेतला जात आहे. लवकरच महापालिका व पोलिसांची संयुक्त बैठक घेऊन ठोस निर्णय घेण्यात येणार आहे,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
सिटी न्यूजचा आग्रह – कायमस्वरूपी तोडगा हवा!
सिटी न्यूजकडे नागरिकांनी सादर केलेल्या वीडिओ क्लिप्स, तक्रारी व माहितीच्या आधारे हे स्पष्ट होत आहे की, शहरातील प्रमुख उड्डाणपुलाखाली असलेल्या भटकंती समूहामुळे शहराची प्रतिमा मलिन होत आहे. महत्त्वाचे म्हणजे पोलीस आणि महापालिका प्रशासन यांच्यात समन्वय अभाव दिसतो.
- मुख्य मुद्दे –
उड्डाणपुलाखाली भटकंती लोकांचा ठिय्या कायम - रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना त्रास, मोबाइल हिसकावणे, मारहाण
- पोलिसांकडून केवळ तात्पुरती कारवाई – गुन्हे दाखल नाही
- मजुरावर हल्ल्याचा व्हिडिओ सिटी न्यूजकडे दाखल
- प्रशासनाकडून अद्याप ठोस आणि दीर्घकालीन उपाय नाही
- महापालिका आणि पोलिसांकडून संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन
प्रतिनिधी – अजय श्रुंगारे