अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापूर येथे भीषण कंटेनर अपघात

अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापूर शहर पोलीस स्टेशन हद्दीत 30 मे रोजी मध्यरात्री दीडच्या सुमारास एक थरारक आणि जीवघेणी घटना घडली. एमएच 14 एचयू 9598 क्रमांकाचा कंटेनर भीमनगर परिसरात भरधाव वेगाने (110-120 किमी/तास) अनियंत्रित होऊन थेट घरांवर आदळला आणि पलटी झाला. या जोरदार धडकेत दोन-तीन घरांचे मोठे नुकसान झाले, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
झोपेत असलेल्या महिलांना, लहानग्या मुलांना आणि वृद्धांना जोरदार आवाजाने जाग आली. धडकेत विजेचा पुरवठा खंडित झाला आणि परिसरात गोंधळ उडाला. भीमनगर परिसरातील अनेक नागरिकांनी “देवा, थोडक्यात वाचलो; रात्रच उलटली असती!” अशी भीती व्यक्त केली.
गोरक्षकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमरावतीहून कामरगावकडे जात असलेल्या चार संशयित कंटेनरच्या मागोमाग पोलिसांचा पाठलाग सुरू होता. त्यापैकी एका कंटेनरमध्ये मृत म्हैस आणि गाय आढळून आल्या असून तो कंटेनर कारंजा ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. उर्वरित दोन कंटेनर पसार झाले, तर चौथा कंटेनर म्हणजे हा एमएच 14 एचयू 9598 क्रमांकाचा कंटेनर भरधाव वेगाने मुर्तीजापूरकडे पळत होता.
भीमनगरच्या वळणावर कंटेनर चालकाने वाहनातून उडी मारून पळ काढला. त्यानंतर कंटेनर घरांवर आदळून पलटी झाला. या अपघातात भिंती कोसळल्या, पोल मोडले व घरातील वस्तूंचा चक्काचूर झाला. घरातील लोक धडधडून थरथर कापत घराबाहेर निघाले.
कंटेनरमध्ये हार्डवेअर आणि वेल्डिंग साहित्य आढळून आले आहे. चालक अद्याप फरार असून, शहर पोलिस तपास करत आहेत.
घटनेच्या मागे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत — चालकाने का पळ काढला? कंटेनरमधील माल कायद्यानुसार होता का? चोरीचा कंटेनर होता का? गोरक्षकांच्या पाठलागामुळेच कंटेनर वेगाने धावत होता का?
भीमनगरमधील एका स्थानिक महिला रहिवासीने प्रतिक्रिया दिली, “सर्व घर हादरलं, झोपेतून धावत बाहेर पडलो. लहान मुलं घाबरून रडायला लागली. रात्रच उलटली असती, देवाने वाचवलं.”
मुर्तीजापूर पोलिस घटना ठिकाणी तातडीने पोहोचून तपास सुरू आहेत. पुढील तपासात खरी परिस्थिती समोर येण्याची अपेक्षा आहे.