डॉ .राजेंद्र गोडे वैद्यकीय महविद्यालय आणि हॉस्पिटल येथे जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्य जनजागृति अभियान
अमरावती : ३१ मे हा ” जागतिक तंबाखू विरोधी दिवस ” म्हणून पाळला जातो. यावर्षी जागतिक आरोग्य संघटनेने तंबाखू आणि तत्सम मादक पदार्थांच्या उत्पादनांवरील संबधित उद्योगांचे फसवे डावपेच उघड करणे या संकल्पनेवर लक्ष केंद्रित करून त्याबद्दल जनजागृतीचे धाडसी पाऊल हाती घेतले आहे.
भारत तंबाखूचा वापर करणारा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश बनला आहे.
आज भारतात २८% युवा पिढी तंबाखू आणि तत्सम पदार्थाच्या आहारी गेली आहे. तंबाखूचा वापर हा आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे कारण असे आढळले आहे की, तंबाखूचे सेवन करणाऱ्या ५०% लोकांच्या मृत्युकरिता, तंबाखूच प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या जबाबदार असतो. तंबाखूविरोधी प्रभावी धोरणांमुळे अनेक देशांमध्ये सिगरेटच्या वापराचे प्रमाण कमी झाल्यामुळे, तंबाखू उद्योगांनी निकोटीनच्या वितरणासाठी अत्याधुनिक आणि कायद्याच्या पेचात न येणाऱ्या उत्पादनां मध्ये विविधता आणि नाविन्य आणले आहे, जसे की इलेक्ट्रॉनिक सिगारेट, वेपिंग उपकरणे, निकोटिन पिशव्या आणि इतर आकर्षक सिगारेट उत्पादने, ज्याकडे किशोरवयीन मुले आणि मुली लगेच आकर्षित होतात.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय वैद्यकीय परिषद तसेच आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने नॅशनल टोबॅको फ्री युथ कॅम्पेन २.० च्या अंतर्गत भारतातील सर्व वैद्यकीय महविद्यालयांमध्ये तंबाखू निवारण केंद्राचे माननीय केंद्रीय आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्री श्री जगतप्रकाश नड्डा यांच्या हस्ते ऑनलाईन अनावरण कऱण्यात आले होते. या ज्वलंत जागतिक पातळीवरील संकटाला हाताळण्याचा उद्देशाने जनजागृती अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. म्हणूनच डॉ.राजेंद्र गोडे वैद्यकीय महविद्यालय आणि हॉस्पिटल येथे ३१ मे रोजी, जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्य विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अधिष्ठाता डॉ. सुधा जैन,संचालक डॉ सुनील हतकर , प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डॉ. नीरज मुरके यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या कार्यक्रमादरम्यान इंदिरा बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, मा. श्री योगेंद्रजी गोडे यांच्या हस्ते रुग्णांकरीता उपयुक्त माहिती पत्रकांचे वाटप करण्यात आले. मानसोपचार विभागाचे विभागप्रमुख डॉ रोमिल वारकरी यांनी कार्यक्रमादरम्यान अत्याधुनिक तंबाखू वापराची उपकरणे आणि त्यांच्या सुरक्षिततेबद्दल पसरविण्यात येणारे उत्पादकांचे फसवे दावे याबाबत येणाऱ्या पिढीला जागरूक करण्याची नितांत गरज उपस्थितांना पटवून दिली.
तसेच तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम आणि त्यावर उपलब्ध असणाऱ्या हमखास उपचार या विषयावर जनजागृतीपर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सांगता डॉ संजीवनी पांडे यांच्या आभार प्रदर्शना नंतर कऱण्यात आली. इंदिरा बहुद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री योगेंद्रजी गोडे, सचिव मिस तन्वी गोडे, मुख्य संचालक डॉ दिलीपजी गोडे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ योगेश गोडे हे नेहमीच अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांना राबविण्यात प्रोत्साहन देत असतात. यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे अश्या अनेक आधुनिक उपचार सुविधा या रुग्णालयात उपलब्ध आहेत त्यामुळचे अत्यंत कमी काळात या रुग्णालयाची सर्वदूर ख्याती पसरली आहे. डॉ.राजेंद्र गोडे वैद्यकीय महविद्यालय आणि हॉस्पिटल अंतर्गत तंबाखू निवारण केंद्रामध्ये तंबाखू आणि तत्सम पदार्थाच्या व्यसनावर उपचार आणि समुपदेशन निःशुल्क उपलब्ध आहे. या कार्यक्रमाद्वारे गरजू रुग्णांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.
प्रतिनिधी – नितेश किल्लेदार