LIVE STREAM

AkolaLatest News

बाळापुरात मान्सूनपूर्व पावसाचा शेतकऱ्यांवर घाला; ज्वारीला फुटले कोंब

अकोला : बाळापुर तालुक्यात मान्सूनपूर्व मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या संकटात कमालीची भर टाकली आहे. विशेषतः ज्वारी उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत आले असून, प्रशांत गायकवाड या शेतकऱ्याच्या ज्वारी पिकावर तब्बल २ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

गायकवाड यांच्याकडे साडेतीन एकर शेती असून, यंदा त्यांनी आधी सोयाबीन आणि कांद्याची लागवड केली होती. मात्र, बाजारभावात फटका बसल्याने आधीच नुकसान झेलावे लागले. यानंतर शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी सोंगणी करून ज्वारी पीक शेतात ठेवले होते. मात्र, चार दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने त्यांच्या आशा-आकांक्षांवर अक्षरशः पाणी फिरवले.

ज्वारी काळी, कंसाला फुटले कोंब
जवळपास दोन एकर क्षेत्रातील ज्वारी पीक पूर्णपणे काळे पडले आहे. विशेष म्हणजे ज्वारीच्या कंसावर कोंब फुटल्याने हे पीक आता कोणत्याही प्रकारे वापरात येणार नाही. शेतकरी गायकवाड यांनी बुलढाणा अर्बन बँकेत सोनं गहाण ठेवून या पिकासाठी खर्च केला होता.

शेतकऱ्याच्या भावना – “स्वप्नं मातीमोल झाली”

“मी शेवटचा प्रयत्न म्हणून ज्वारी लावली होती, पण आता सगळं संपलं… कोंब फुटलेली ज्वारी पाहून डोळे भरून येतात…”
— प्रशांत गायकवाड, शेतकरी, बाळापूर

त्यांच्या डोळ्यांतील अश्रू आणि वाकलेली कणधार पाहून परिसरातील इतर शेतकरीही हळहळ व्यक्त करत आहेत. शेतात उभं पीक काळं पडलेलं पाहून आत्महत्येचे विचार सतत मनात येत असल्याची भावना गायकवाड यांनी बोलून दाखवली.

प्रशासन आणि सरकारकडे मागणी:
शेतकऱ्याच्या या गंभीर अवस्थेकडे प्रशासन आणि कृषी विभागाने तात्काळ लक्ष देण्याची गरज आहे. पिक विमा योजना, तातडीची मदत आणि कर्जमाफी यासारख्या उपाययोजना त्वरीत राबवण्याची मागणी होत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!