अकोल्यात स्केटिंगचा अनोखा विक्रम: ४० स्केटर्सनी केले सलग ९ तास स्केटिंग!

अकोला : अकोला जिल्हा ॲडव्हॉक स्केटिंग कमेटीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या श्रेणीत सलग ९ तास नॉन-स्टॉप स्केटिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली. ही स्पर्धा सीताबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडली.
या स्पर्धेचा उद्देश फक्त खेळापुरता मर्यादित नसून, विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक व बौद्धिक संतुलनाचा विकास करण्यावर भर देणारा होता. स्केटिंगचा नियमित सराव केल्यामुळे एकाग्रता, सहनशक्ती, आत्मविश्वास आणि धाडस यांसारखे गुण विद्यार्थ्यांमध्ये विकसित होतात, हे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
सकाळपासून सुरू झालेल्या या उपक्रमात विविध वयोगटातील सुमारे ४० स्केटर्सनी भाग घेतला, आणि ९ तासांच्या सलग प्रदर्शनात त्यांनी आपले कौशल्य सादर करत उपस्थितांची मनं जिंकली.
कार्यक्रमाचे आयोजन अकोला ॲडव्हॉक स्केटिंग कमेटीच्या पदाधिकाऱ्यांनी केले होते. यावेळी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी पालक, प्रशिक्षक व क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.
हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शक ठरणारा असून, पुढील काळात याचे अधिक व्यापक स्वरूपात आयोजन केले जाईल, असे आयोजकांनी सांगितले.