LIVE STREAM

Amaravti GraminLatest News

आर्टिकाचे आमिष भोवले! परतवड्याजवळ दहा लाखांची लूट

परतवाडा : आर्टिका कार खरेदीच्या आमिषावरून परतवाडा-चांदूर मार्गावरील त्रिवेणी संगम मंदिराजवळ एका नागरिकाची तब्बल १० लाख रुपयांची लूट करण्यात आली आहे. ही धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी घडली असून, परतवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चांदूर रेल्वे तालुक्यातील सुपरवाळा गावचे रहिवासी सुधाकरराव नामदेव राऊत यांनी नवीन आर्टिका कार खरेदी करण्यासाठी एका दलालाच्या माध्यमातून व्यवहार निश्चित केला होता. संबंधित डील ठरल्याप्रमाणे त्रिवेणी संगम मंदिराजवळ बोलावण्यात आले. मात्र, ही योजना चक्क लुटीच्या उद्देशाने रचण्यात आली होती.

ठरल्याप्रमाणे, एका ईरटीका कारमधून दोन इसम आले आणि त्यांनी राऊत यांच्यासोबत असलेल्या दलालाला मारहाण करून त्यांच्याकडील १० लाख रुपयांची रोकड हिसकावून पळ काढला.

घटनेची माहिती मिळताच परतवाडा ठाण्याचे ठाणेदार सुरेश मस्के तसेच अचलपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी शुभम कुमार घटनास्थळी दाखल झाले असून, तपास सुरू आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सदर व्यवहार सुनसान परिसरात, मंदिराजवळ का ठरवण्यात आला? हा देखील महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे. या व्यवहारात दलालाची भूमिकाही संशयाच्या भोवऱ्यात सापडली असून, पोलिस दलालाची सखोल चौकशी करीत आहेत.

परतवाडा पोलिसांच्या विविध पथकांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. घटनास्थळी सापडलेल्या सीसीटीव्ही फुटेजसह स्थानिक माहितीचा आधार घेत तपास अधिक गतीने सुरू करण्यात आला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!