धारणीजवळील उतावली गावात बिबट्याचा मुक्त संचार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

धारणी : धारणी तालुक्यातील उतावली गावात मागील दोन दिवसांपासून बिबट्याच्या मुक्त संचारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. धारणी शहरापासून अवघ्या 7 किमी अंतरावर असलेल्या उतावली गावाच्या मेन रोडवर संध्याकाळी व रात्रीच्या वेळी बिबट्या वारंवार दिसत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.
नागरिक आणि शेतकरी भयभीत
स्थानिक नागरिक, शेतकरी आणि प्रवाशांना सायंकाळपासून रात्रीपर्यंत बिबट्याचा वावर दिसत असल्याने जीव मुठीत घेऊनच शेतात व प्रवास करत आहेत. शेतकऱ्यांना आपल्या शेतीची मशागत करण्यासाठी रात्री बाहेर पडावे लागते, मात्र बिबट्याच्या धास्तीमुळे त्यांचा घबराटीचा अनुभव सुरू आहे. अनेकांनी शेतकाम तात्पुरते थांबवले आहे.
वनविभाग सतर्क, मात्र हालचाल अद्याप अस्पष्ट
वनविभागाने या घटनेची दखल घेत तपास सुरू केला आहे. धारणी वनविभागाची टीम बिबट्याच्या हालचालींचा मागोवा घेण्याच्या प्रयत्नात असून, बातमी लिहीपर्यंत कोणतीही ठोस बिबट्याची हालचाल प्रत्यक्षात सापडलेली नाही.
व्हायरल व्हिडीओ आणि फोटो
गावातील काही सतर्क नागरिकांनी बिबट्याचा मोबाइलमध्ये व्हिडीओ व फोटो कैद केले असून, हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे आणि नागरिक प्रशासनाकडून त्वरीत कारवाईची मागणी करत आहेत.