अंबाझरीतील ‘निंबस लाऊंज’वर पहाटे ३ वाजता छापा, बेकायदेशीर हुक्का पार्लर उघडकीस

नागपूर : नागपूर शहर पोलिसांच्या ‘ऑपरेशन थंडर’ मोहिमेअंतर्गत आज पहाटे अंबाझरी परिसरातील ‘निंबस लाऊंज’ या ठिकाणी बेकायदेशीर हुक्का पार्लरवर धडक कारवाई करण्यात आली. एसीपी सुनीता देशमुख यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सकाळी ३ वाजता अचानक छापा टाकत हुक्का पुरवठा आणि धूरयुक्त वातावरण असलेले हुक्का फ्लोअर सील केले.
हुक्का बंदीचा भंग; पोलिसांची कारवाई
राज्यात हुक्का पार्लरवर बंदी असतानाही, या लाऊंजमध्ये गुपचूप हुक्का पुरवठा सुरु होता. विशेष म्हणजे, दरवाजे आतून बंद करून तरुण-तरुणींना हुक्का दिला जात होता — जेणेकरून पोलिस कारवाईपासून बचाव करता येईल. मात्र पोलिसांनी ही माहिती मिळवून तातडीने धाड घालून सगळा प्रकार उघडकीस आणला.
लाऊंज मालकाविरोधात गुन्हा दाखल
पोलिसांनी लाऊंजमधून हुक्का सेट्स, फ्लेवर्ड तंबाखू, कोळसे आणि इतर साहित्य जप्त केले असून, लाऊंज मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कायद्याचे उल्लंघन करून सार्वजनिक ठिकाणी आरोग्याला धोका पोहोचवणाऱ्या या प्रकाराविरोधात कठोर कारवाईचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.
पोलिसांकडून कडक इशारा
नागपूर पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, “तरुणांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या बेकायदेशीर हुक्का पार्लर्सना माफ केले जाणार नाही.” ऑपरेशन थंडर अंतर्गत अशा अड्ड्यांविरुद्ध सुरू असलेली मोहिम अधिक तीव्र करण्यात येणार आहे.