LIVE STREAM

Amaravti GraminLatest News

नांदगाव खंडेश्वर हादरले: पत्रकार सागर सव्वालाखे यांच्या घरात दीड ते दोन लाखांची चोरी

नांदगाव खंडेश्वर : नांदगाव खंडेश्वर शहरात पुन्हा एकदा मध्यरात्री घरफोडीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. शहरातील गजानन नगर आणि छोरीया नगर भागात सराईत चोरट्यांनी केलेल्या धाडसी चोरीने पोलीस प्रशासनाला खुले आव्हान दिलं आहे. विशेष म्हणजे या घरफोडीत पत्रकार सागर सव्वालाखे यांच्या घरावर डल्ला टाकून चोरट्यांनी सुमारे १.९२ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.

तपशीलवार माहिती अशी आहे की –
दि. ९ जून रोजी मध्यरात्री २.३० ते ३.०० वाजेदरम्यान गजानन नगर, छोरीया नगर परिसरात चोरट्यांनी चार घरांना टार्गेट केले. गौरव वितोंडे, सतीश पटेल, डॉ. बनसोड यांच्या घरात चोरीचा प्रयत्न झाला, तर पत्रकार सव्वालाखे यांच्या घरात चोरट्यांनी यशस्वी डल्ला मारला.
चोरट्यांनी लाकडी दरवाज्याची कडी तोडून घरात प्रवेश केला व गोदरेज कपाटातून दिड ते दोन लाख रुपयांची रोख रक्कम, चांदीचे दागिने आणि सोन्याची अंगठी चोरली.

सीसीटीव्ही फुटेज आणि पोलिस तपास
घटनास्थळी पोलीस निरीक्षक किरण औटे, पोलीस उपनिरीक्षक तुळजेवार यांनी भेट देत पाहणी केली. श्वान पथकाची मदत घेण्यात आली असून, काही महत्त्वाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहेत. पोलिसांच्या मते चोरटे अत्यंत सराईत असून चोरी करताना कोणतीही भनक लागली नाही.

नागरिकांमध्ये अस्वस्थता आणि मागण्या
या चोरीमुळे नागरिकांमध्ये प्रचंड असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. मुख्य रस्त्यांप्रमाणेच आता गर्दी नसलेल्या वसाहती आणि गल्ली भागातही पोलीस पेट्रोलिंग वाढवण्याची मागणी नागरिक करत आहेत.
घरफोड्यांचं हे सत्र तात्काळ थांबवण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

गुन्हा दाखल | तपास सुरू
या घटनेबाबत नांदगाव खंडेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास अधिक गतीने सुरू आहे. पोलीस लवकरच चोरट्यांना जेरबंद करतील, असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!