नागपुरात इलेक्ट्रॉनिक वायर चोरटा जेरबंद! – १.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त, युनिट ३ ची कारवाई

नागपूर : नागपूर शहरात विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत इलेक्ट्रॉनिक वायर चोरी करणारा आरोपी योगेश उर्फ लक्की रमेश शाहू (वय 27) यास पोलिसांनी अटक केली आहे. युनिट 3 गुन्हे शाखेच्या पथकाने ₹1,75,000/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करत ही यशस्वी कारवाई केली.
गुप्त माहितीवरून पोलिसांची कारवाई
फिर्यादी मंगेश प्रभु वाघमारे (वय 52) यांच्या तक्रारीनुसार ही कारवाई सुरू झाली. पेट्रोलिंग दरम्यान पोलीस अंमलदार जितेश रेड्डी यांना मिळालेल्या माहितीवरून, लक्की शाहू हा अशोक चौक येथे बोरी घेऊन उभा असल्याचे निदर्शनास आले.
तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन पोलिसांनी छापा टाकत आरोपीला ताब्यात घेतले. चोरीस गेलेली वायर व गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त करण्यात आले, जे एकूण ₹1,75,000/- मूल्याचे होते.
- विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल
लक्की शाहू विरोधात: - धंतोली पोलीस ठाण्यात BNS अंतर्गत 2 गुन्हे
- सदर व सोनेगाव पोलीस ठाण्यांत विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल आहेत.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनात कारवाई
ही कारवाई माननीय पोलीस आयुक्त श्री. रविंद्र सिंगल, सह आयुक्त श्री. नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. वसंत परदेशी, उप आयुक्त (डिटेक्शन) श्री. राहुल माकनीकर, आणि सहायक आयुक्त डॉ. अभिजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ३, नागपूर पथकाने केली.