माहूरमध्ये विजेचा खांब तुटल्यावर कर्मचाऱ्यांनी चिखलात उतरून केली वीज सेवा सुरळीत
श्री क्षेत्र माहूर मंगळवारी सायंकाळी सोसाट्याचा वारा सुटल्याने धनोड्या जवळ उच्च दाबाच्या विज वाहिनीचा सिमेंट खांब तुटून पडला.त्यामुळे माहूर शहरासह संपूर्ण तालुक्याचा सुमारे 12 तास विद्युत पुरवठा खंडित झाला होता.विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यासाठी सहायक अभियंता राहुल शेंडे यांच्या मार्गदर्शनात कर्मचाऱ्यांनी पडत्या पावसात चिखल तुडवत खांद्यावर खांब वाहून नेऊन कर्तव्यभाव निभावला.
माहूर शहरांसह तालुक्याला गुंज येथून विद्युत पुरवठा केला जातो. मंगळवार दि. 10 जून रोजी सायं.6 वाजताचे सुमारास पावसासह सोसाट्याचा वारा सुटला होता. त्यात माहूरकडे येणाऱ्या 33 केव्ही वीज वाहिनीचा सिमेंट खांब एका शेतात तुटून पडला होता.मोठा पाऊस झाल्याने काळ्या मातीच्या शेतात मोठ्या प्रमाणात चिखल झाला होता. कुठलेही वाहन तिथे नेणे शक्य नसल्याने सहाय्यक अभियंता राहूल शेंडे यांच्या नेतृत्वाखाली,संतोष नागलवाड, प्रविण राठोड,रामेश्वर जाधव, उमेश राठोड, आशिर्वाद वानखेडे, पवन कनाके व ज्ञानेश्वर उपासे या कर्मचाऱ्यांनी विद्युत खांब खांद्यावर उचलून नेऊन उभा केला.वारंवार विद्युत पुरवठा खंडित झाल्याने ग्राहकांचा रोष पत्करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे हे कर्तव्य निश्चितच कौतुकास्पदच म्हणावे लागेल.
🖊️ प्रतिनिधी: गोपाल चव्हाण