मुर्तीजापुर-कारंजा हायवेवर भीषण अपघात

मुर्तीजापुर : मुर्तीजापुर-कारंजा हायवेवर आज पहाटे ३ वाजता भीषण अपघात घडला. पुण्याहून नागपूरकडे येणारी संजय नागपूर ट्रॅव्हल्स बस अंडर-कन्स्ट्रक्शन रस्त्यावर उभ्या असलेल्या जेसीबीला जोरदार धडकली. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी दोन जण जखमी झाले असून वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार, झारखंडचे रहिवासी असलेले जेसीबी चालक सुनील प्रजापती हे रात्री उशिरा रस्त्याच्या कडेला अंडर-कन्स्ट्रक्शन कामासाठी जेसीबीसह थांबले होते. दरम्यान, भरधाव वेगात असलेली MH-40-BL-8361 क्रमांकाची संजय नागपूर ट्रॅव्हल्स बस भडशिवनी ते खेर्डा दरम्यान या जेसीबीवर आदळली.
या अपघातात जेसीबी चालक सुनील प्रजापती आणि ट्रॅव्हल्सचा चालक नितेश उमाटे हे दोघे किरकोळ जखमी झाले असून त्यांना तत्काळ उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेत ट्रॅव्हल्स आणि जेसीबी दोन्ही वाहने मोठ्या प्रमाणात नुकसानीस बळी पडली आहेत. प्रवासी सुखरूप असून कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही.
स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे. सदर रस्ता अंडर-कन्स्ट्रक्शन असल्यामुळे वाहतुकीच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.