मेळघाटात मुसळधार पावसाचा तडाखा – सेमाडोह, माखला गावातील घरांचे नुकसान, आमदार केवलराम काळे यांनी केली पाहणी
चिखलदरा : मेळघाट परिसरातील सेमाडोह आणि माखला गावात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी चिखलदरा मतदारसंघाचे आमदार केवलराम काळे यांनी आज प्रत्यक्ष दौरा करून केली. त्यांच्या सोबत चिखलदरा तहसीलदार जिवन मोरणकर, संबंधित विभागांचे अधिकारी, तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच व नागरिक उपस्थित होते.
या दौऱ्यात घरांचे छप्पर उडणे, भिंती कोसळणे, पाण्याचे घरात घुसणे यासारखी गंभीर नुकसान झाल्याची नोंद झाली. आमदार काळे यांनी नुकसानग्रस्त नागरिकांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत पुरवण्याचे स्पष्ट निर्देश प्रशासनाला दिले.
“नुकसानग्रस्तांना तातडीने मदत मिळाली पाहिजे. यामध्ये कोणताही विलंब खपवून घेतला जाणार नाही,”
— आमदार केवलराम काळे
प्रशासनाने तत्काळ पंचनाम्याची प्रक्रिया सुरू केली असून, अहवाल तयार करून लवकरच शासनाकडे सादर केला जाईल, अशी माहिती तहसीलदार मोरणकर यांनी दिली.
या दौऱ्यादरम्यान अनेक ग्रामस्थांनी आमदार काळे यांच्याशी संवाद साधून आपली व्यथा मांडली. आमदारांनी प्रत्येक नागरिकाला दिलासा देत सांगितले की, “मी स्वतः मदतीसाठी पाठपुरावा करणार आहे, शासन प्रत्येक नुकसानग्रस्ताच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे.”
यावेळी गजानन काकड, सरपंच, उपसरपंच, आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.