राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज अकोला दौऱ्यावर
अकोला : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते अजित पवार हे आज अकोला दौऱ्यावर आहेत. विशेष म्हणजे तब्बल १४ वर्षांनंतर ते अकोल्यात येत असून, त्यामुळे त्यांच्या दौऱ्याला विशेष राजकीय आणि प्रशासकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
आजच्या दौऱ्यादरम्यान अजित पवार हे अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा नियोजन भवनात घेणार आहेत. प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, जिल्हाधिकारी, पालकमंत्री, लोकप्रतिनिधींसोबत विविध योजनांची सद्यस्थिती आणि प्रगती यांचा तपशीलवार आढावा घेण्यात येणार आहे.
या बैठकीनंतर शहरातील पोलिस लॉन येथे भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, या मेळाव्यात महत्त्वाचे पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही स्थानिक नेते व पदाधिकाऱ्यांचा प्रवेश अपेक्षित आहे.
या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अकोला शहरात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे विविध ठिकाणी स्वागत फलक लावण्यात आले आहेत. कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, दौऱ्याचे नेतृत्व शहर आणि ग्रामीण संघटनांकडून एकजुटीने करण्यात येत आहे.
राजकीयदृष्ट्या हा दौरा अकोल्यातील आगामी राजकीय समीकरणांवर परिणाम घडवणारा ठरू शकतो, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
(प्रतिनिधी) – मुकेश ढोके