अमरावती सायकलिंग असोसिएशन तर्फे पंढरपूर सायकल वारीचे आयोजन

अमरावती : अमरावती सायकलींग असोसिएशनने दरवर्षीप्रमाणे यंदाही सामाजिक, आरोग्यवर्धक आणि पर्यावरणपूरक उद्दिष्ट ठेवत पंढरपूर सायकल वारी 2025 चे आयोजन केले आहे. या वारीत संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे ३ ते ४ हजार सायकलस्वार सहभागी होणार आहेत. ही माहिती नुकत्याच घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.
असोसिएशनचे अध्यक्ष आणि पदाधिकारी यांनी सांगितले की, अमरावतीतून 38 सायकलस्वार आणि 4 सहकारी सदस्य सहभागी होणार आहेत. ही सायकलवारी 18 जून रोजी सकाळी 6 वाजता एकवीरा देवी मंदिर प्रांगणातून सुरू होणार आहे. एकूण 550 किलोमीटरचे अंतर पार करत ही वारी 22 जून रोजी पंढरपूरला पोहोचणार आहे.
सायकलींग असोसिएशन ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांमध्ये सायकलिंगची आवड निर्माण करणे, आरोग्य जागरूकता वाढवणे व पर्यावरणपूरक प्रवासाला प्रोत्साहन देणे या उद्दिष्टाने काम करत आहे. याअंतर्गत राष्ट्रीय स्तरावर विविध सायकलिंग चॅलेंजेस आणि उपक्रमही राबवले जातात, ज्याला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो.
वारीसाठी विशेष आकर्षण:
सायकलस्वार विविध शहरांतून मार्गस्थ होऊन पंढरपूरकडे वाटचाल करणार
वारी दरम्यान आरोग्य तपासणी, रिफ्रेशमेंट स्टॉप्स, आणि सुरक्षा व्यवस्थेचीही संपूर्ण काळजी
महिलासह विविध वयोगटातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
या वारीचे उद्दिष्ट म्हणजे सायकल प्रवासाच्या माध्यमातून पर्यावरण रक्षण, फिटनेस, आणि सांस्कृतिक एकात्मतेचा प्रसार करणे हे आहे. अमरावती सायकलींग असोसिएशनच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, यात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी लवकर नोंदणी करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.